श्री चक्रधर स्वामी अवतरणदिनानिमित्त दीपोत्सव साजरा करा
खिर्डी श्रीकृष्ण मंदिर संस्थान चे मठाधिपती प्रदीप महाराज यांचे भाविकांना आवाहन
खिर्डी : श्री चक्रधर स्वामी यांचा अष्टशताब्दी अवतारदिन महोत्सव 20 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत असलातरी कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित न करता घरोघरी दिवे लावून संपूर्ण देशभर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. भाविकांनी दिवे लावून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन खिर्डी श्रीकृष्ण मंदिर संस्थानचे मठाधिपती प्रदीप महाराज यांनी भाविकांना केले आहे. श्री चक्रधर स्वामींच्या अवतरणाला 20 ऑगस्ट रोजी 800 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानुषंगानेच हा अष्टशताब्दी महोत्सव 20 ऑगस्ट रोजी प्रारंभ होऊन पुढील 2021 पर्यंत भारतभर साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे 20 ऑगस्ट रोजी अवतारदिनाच्या कार्यक्रमाचे वेळी सर्व संत-महंत-तपस्विनी व उपदेशी तथा अनुयायी आश्रम, तीर्थस्थान, देवपूजा, घरासमोर जास्तीत जास्त दीप लावून विडावसर, आरती करून संपूर्ण भारतात आनंद उत्सव साजरा करणार आहेत.
घरातच दिवे लावण्याचे आवाहन
अष्ट शताब्दी महोत्सवानिमित्त प्रत्येकाने घरात कमीत कमी आठ दिवे लावून उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यामुळे या महोत्सवाला यावर्षी महत्त्व प्राप्त झाले आहे. जळगाव जिल्ह्यातही भाविक घरोघरी दीपात्सव साजरा करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी हा उत्सव होणार आहे, हा अवतरणदिन संपूर्ण जिल्हा, राज्य,व पूर्ण भारतभर साजरा करण्यात येणार आहे.

वर्षभर प्रबोधनाचे ऑनलाईन यू ट्यूब चॅनेलवर कार्यक्रम
श्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी महोत्सवाला 20 ऑगस्ट 2020 पासून प्रारंभ होत आहे. पुढील एक वर्ष हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त श्री राऊळ, ईश्वर ज्ञान चॅनेल, पॉझीटीव्ह महानुभाव, महानुभाव पंथ वाहिनी आदी विविध यू ट्यूब चॅनेल्सवर वर्षभर प्रबोधनात्मक ऑनलाईन कार्यक्रम पार पडणार आहेत. यामध्ये श्री चक्रधर स्वामींचे कार्य, त्यांनी जगाला दिलेला संदेश यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
दीप लावून साजरा व्हावा महोत्सव
श्री चक्रधर स्वामी अवतरण दिनाच्या निमित्य साधून 20 रोजी महानुभाव पंथातील सर्वांनी घरोघरी हजारो दीप लावून दिपोत्सव साजरा करावा तसेच मंदिर, आश्रम, तीर्थस्थान या ठिकाणी जास्तीत जास्त दीप लावून महोत्सव साजरा करावा, असे आवाहन श्रीकृष्ण मंदिर संस्थापचे मठाधिपती प्रदीप महाराज यांनी केले आहे.

