कारवाई न करताच सोडले महसूल अधिकार्याने ट्रॅक्टर
रावेर तालुक्यातील धक्कादायक प्रकार : चौकशीची मागणी
रावेर : सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वाळूने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली ओंकारेश्वरनजीक महसूल विभागाच्या एका अधिकार्याने पकडल्याच्या काही वेळातच सोडून दिल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. रावेरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदारांची तालुकाभरात अवैध वाळूवर धडक कारवाई करण्याची ख्याती असतांना त्यांच्याच एका अधिकार्यांने सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पकडलेले अवैध गौण खनिजाचे सोडल्याने महसूल विभागात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तामसवाडी डून ब्लू रंगाची वाळूने भरलेली ट्रॉली व स्वराज्य कंपनीचे ट्रॅक्टर रावेरच्या दिशेने येत असतांना महसूलच्या एका अधिकार्याने पकडले खरे परंतु ट्रॅक्टर मालकाशी थेट मोबाईलवरुन बोलून सोडून दिल्याने अवैध वाळू चालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मंगळवारी वाळूचे ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडले
सोमवारी पकडलेले ट्रॅक्टर एका अधिकार्याने सोडल्यानंतर मंगळवारी दुपारी भोकरीनजीक (एम.एच.19 ए.एन. 3577) क्रमांकाच्या ट्रॅक्टरसह ट्रॉलीवर नायब तहसीलदार सी.जी.पवार, मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी दादाराव कांबळे, विठोबा पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.


