सावखेडासीमच्या तरुण अभियंत्याचा जहाज स्फोटात अमेरीकेत मृत्यू
यावल : तालुक्यातील सावखेडासीम येथील रहिवासी व अमेरीका येथे जहाजावर अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या 27 वर्षीय तरुणाचा अमेरीकेत जहाजाच्या झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. आसीफ मो.हनीफ तडवी असे मृत तरुणाचे नाव आहे. 14 जुलै रोजी जहाजावर स्फोट झाल्यानंतर जखमी अवस्थेत आसीफ तडवीवर उपचार सुरू होते व गत आठवड्यात त्याचा मृत्यू झाला. रविवार, 23 ऑगस्ट रोजी त्याचा मृतदेह मुंबई आणण्यात आला असून रात्री उशिरा मूळ गावी सावखेडासीम येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.
सावखेडासीम गावावर शोककळा
सावखेडासीम, ता.यावल येथील रहिवासी तथा तलाठी मोहंमद हनिफ तडवी यांचा लहान मुलगा आसीफ मो. हनीफ तडवी (27) हा अमेरीकेत एका जहाज कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता. 14 जुलै रोजी समुद्रात जहाजामध्ये स्फोट झाल्याने त्यात आसीफ हा गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर अमेरीकेतील मियामी, फ्लोरिडा येथील जॅकसन हेल्थ सिस्टीम या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गत आठवड्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्या भरापासून त्याचा मृतदेह भारतात मुळ गावी आणण्याकरीता हालचाली सुरू होत्या व अखेर विशेष विमानाने त्याचा मृतदेह रविवारी मुंबई येथे आणण्यात आला व तेथून मूळ गावी सावखेडा येथे मृतदेह आणण्यात येत असून रविवारी रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात येणार आहे. मयताच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक भाऊ, एक बहिण असा परीवार आहे.


