खासदार रक्षा खडसेंच्या प्रयत्नाने मध्य प्रदेश पोलिस सीमा तपासणी नाक्याचे स्थलांतर


तपासणी नाका आता शिरसोदा फाट्यावर : नागरीकांनी व्यक्त केले समाधान : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उभारला होता तपासणी नाका

मुक्ताईनगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मध्य प्रदेशाच्या सीमा बंद करण्यासाठी अंतुर्ली फाटा, भोटा फाटा या ठिकाणी सीमा तपासणी नाका उभारण्यात आला असलातरी या नाक्यामुळे नागरीकांची सोय कमी गैरसोय अधिक होत असल्याच्या तक्रारी होत्या. या तपासणी नाक्यावरून रुग्णांच्या वाहनांना देखील जावू दिले नसल्याने काही रुग्ण दगावल्याच्याही घटना घडल्या होत्या त्यामुळे खासदार रक्षा खडसे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत होती. अखेर खासदारांनी या प्रश्‍नात लक्ष घातल्यानंतर या तपासणी नाक्याचे आता शिरसोदा फाट्यावर स्थलांतर झाल्याने समाधान व्यक्त होत असून नागरीकांनी खासदारांचे आभार मानले आहेत.

तपासणी नाक्यामुळे गैरसोय अधिक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशाच्या सीमा बंद करण्यासाठी अंतुर्ली फाटा व भोटा फाटा या ठिकाणी मध्यप्रदेश पोलिसांनी सीमा तपासणी नाके उभारले होते. या नाक्यावर कर्तव्यास असलेल्या पोलिसांमुळे अंतुर्ली परीसरातील नागरिकांना मुक्ताईनगर, जळगाव आदी ठिकाणी जाण्यासाठी कमालीचा त्रास होता. या तपासणी नाक्यावरुन रुग्णांच्या वाहनाला ही जाऊ न दिल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या होत्या. शिवाय अंतुर्ली शिवाराची सुमारे पाचशे एकर शेतजमीन या भागात असल्याने शेतकरी, मजुर वर्ग, केळी माल पाहण्यासाठी जाणार्‍या केळी व्यापारी, मुक्ताईनगर येथे शासकीय कामासाठी जाणार्‍या नागरीकांना तपासणी नाक्यावरील पोलिस त्रास देत असल्याच्या तसेच जावू देत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.

शिरसोदा फाट्यावर नाक्याचे स्थलांतर
खासदार रक्षा खडसे यांच्याकडे स्थानिक नागरीकांनी तक्रारी केल्यानंतर खासदार खडसे यांनी स्वतः अंतुर्ली फाट्यावरील तपासणी नाका गाठत शाहपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय पाठक यांना बोलून त्यांच्याशी चर्चा केली तसेच बर्‍हाणपूरचे जिल्हाधिकारी यांच्यांशी चर्चा करून तपासणी नाका हलवण्यास भाग पाडले. यावेळी त्यांच्या सोबत राजु माळी, प्रशांत महाजन, तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन, सरपंच नरेंद्र दुट्टे, ताहेर खा, सुनील पाटील, कैलास दुट्टे आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !