कासारखेडा येथे शेतकर्‍याची आत्महत्या


यावल : तालुक्यातील कासारखेडा येथे एका 45 वर्षीय शेतकर्‍याने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजता घडली. कुर्बान सायबु तडवी असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. संततधार पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला होता व त्यामुळे आलेल्या नैराश्यातून शेतकर्‍याने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

कर्ज डोईजड झाल्याने उचलले टोकाचे पाऊल
कुर्बान सायबु तडवी यांच्याकडे पाच बिघे शेती आहे. त्यात कपाशीसह मका आणि मूग, उडदाचा पेरा केला होता. काही प्रमाणावर बाहेरची शेती देखील नफ्याने करून तेथेही उडीद व मृग यांची पेरणी केली. तेथील मूग, उडीद कापणीला आले आहेत परंतु गेल्या पंधरवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याने त्यात या पिकांचे नुकसान झालेे. या नुकसानीमुळे वडिलांच्या नावे सोसायटीचे घेतलेले कर्ज फेडू शकत नाही, खूप नुकसान होऊन कर्जबाजारी होवू अशा विवंचनेत ते रविवारी सकाळी घरातून निघून गेले. नायगाव रस्त्यावरील संजय पाटील (रा.चिंचोली) यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच त्याचा मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. डॉ.बी.बी. बारेला यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी खलील इतबार तडवी यांनी दिलेल्या खबरी वरून येथील पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत शेतकरी कुर्बान तडवी यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुले व मुलगी असा परीवार आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख, नागपाल भास्कर करत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !