अंतर्नाद-उषा फाऊंडेशनचा उपक्रम समाजासाठी आदर्शवत
माजी जिल्हा परिषद सदस्य कृषीभूषण नारायण चौधरी : जिल्हा परीषद उर्दू शाळेतून केली उपक्रमाची सुरूवात
भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाऊंडेशनने सामाजिक भान जपून एक दुर्वा समर्पणाची हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात समाजातील जास्तीत जास्त घटकांनी सहभागी होऊन लोकचळवळीचे स्वरुप देणे अपेक्षित आहे.उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असे उपक्रम निश्चितच पुरक ठरतील.अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाउंडेशन राबवत असलेला ‘एक दुर्वा समर्पणाची उपक्रम समाजासाठी आदर्शवत उपक्रम आहे, असे मत जि.प.चे माजीम सदस्य कृषीभूषण नारायण चौधरी यांनी बामणोद येथे नमूद केले. अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाउंडेशन तर्फे गणेशोत्सवात ‘एक दुर्वा समर्पणाची’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात सोमवारी बामणोद येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमधे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पथदर्शी उपक्रम : डॉ.नरेंद्र कोल्हे
ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू विध्यार्थी यांच्यासाठी ही मदत छोटी असली तरी लाख मोलाची आहे. अंतर्नादने विध्यार्थ्यांची गरज ओळखून जो उपक्रम राबवला आहे, तो पथदर्शी आहे, असे मत यावल पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.नरेंद्र कोल्हे यांनी व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून बामणोदच्या सरपंच पल्लवी केदारे, केंद्रप्रमुख सुरेश तायडे, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव केदारे, ज्येष्ठ नागरीक पांडुरंग महाजन, मुख्याध्यापक मोहम्मद इसाक हजरत अली यांची उपस्थिती होती. अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रकल्पप्रमुख अमितकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी तर आभार समन्वयक भूषण झोपे यांनी मानले.

35 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
शिक्षक अर्शद हुसेन लियाकत अली, प्रकल्प समन्वयक निवृत्ती पाटील,योगेश इंगळे, प्रदी सोनवणे,समाधान जाधव,उषा फाउंडेशनचे उपाध्यक्ष सौरभ जावळे यांचे सहकार्य लाभले. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या 35 विद्यार्थ्याना प्रत्येकी चार वह्या, पाटी, पाटीची पेंसील, रंग पेटी, स्केल, पेन, पेंसील, खोडरबर, कंपास पेटी, मास्क, सॅनिटायझर असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
अंतर्नाद आणि उषाची मदत कायम स्मरणात राहिल
अंतर्नाद आणि उषा फाउंडेशनने सामाजिक भान जपून एक दुर्वा समर्पणाची हा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून गरीब आणि गरजू विध्यार्थ्याना मोठी मदत होणार आहे. या माध्यमातून या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. अंतर्नाद आणि उषा फाउंडेशनची मदत कायमच आमच्या आणि विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहणार असल्याचे बामणोद सरपंच पल्लवी केदारे म्हणाल्या.

