केळीवर व्हायरस : नुकसानीची भरपाई द्यावी
खासदार रक्षा खडसे यांची कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे मागणी
मुक्ताईनगर : रावेर लोकसभा मतदार संघात केळीवर सी.एम.व्ही. व्हायरस आल्याने केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. या व्हायररपासून बचावासाठी शेतकर्यांनी पिकांची काळजी घेतली शिवाय शासन व कृषी विभागाने सुचविलेल्या उपाय योजना करूनसुद्धा 60 ते 65 टक्के पिकांचे नुकसान होत असल्याने केळी उत्पादकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून शेतकर्याचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सी.एम.व्ही. या व्हायरस पासून पिकांचे नुकसान रोखण्यासाठी शासनातर्फे योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या तसेच सदर सी.एम.व्ही.ह्या रोगास केळी पिक विमा योजनेत समाविष्ठ करून नुकसानग्रस्त केळी उत्पादकांच्या शेतातील केळी पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासदार रक्षाखडसे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे रविवार, 23 ऑगस्ट रोजी पत्राद्वारे केली आहे.
रोगाचे व्हावे समूळ उच्चाटन
रावेर-यावल मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादक हवालदील झाले आहेत. या रोगाचे समूळ उच्चाटन होण्यासाठी सामूहिक पाऊले उचलली गेल्यास केळी बागा रोगमुक्त ठेवता येणार आहेत. या संदर्भात खासदार खडसे यांनी जळगाव केळी संशोधन केंद्र व जळगाव कृषी अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून पुढील दोन दिवसात पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठवावा, अशी मागणीदेखील केली आहे.


