खिरवडच्या 70 वर्षीय वयोवृद्धेच्या खात्यात पेन्शन जमा
तहसीलदारांनी कार्यालयात बोलावून शंकांचे केले निरसन : दात्यांकडून मदतीचा हात
रावेर : खिरवड येथील 70 वर्षाय वृद्धा संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन घेण्यासाठी थेट पायी रावेरात धडकल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सोमवारी वयोवृद्धेला सोमवारी कार्यालयात बोलावून त्यांची समजूत काढत बँक खात्यात पेन्शनची रक्कम जमा केल्याचे कागदपत्र दाखवत आजीचे समाधान केले. यावेळी तहसीलमार्फत कीट वाटप केले. खिरवड येथील जयवंताबाई अटकाळे यांच्याकडे पैसे नसल्याने त्या रावेरपर्यंत पायी आल्या होत्या. या संदर्भात माहिती कळताच पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे थेट त्यांच्या घरी जाऊन सुटीच्या दिवशी आर्थिक मदत केली होती तर अन्य स्वयंसेवी संस्थांनीदेखील सुटीच्या दिवशी मदत केली होती.
प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे
रावेर तालुक्यातील जयवंताबाई अटकाळे सारख्या इतर वृध्द आजी व वृध्द बाबा संजय गांधी निराधार योजनांची प्रकरणे मंजूर झाली वा नाही याची चौकशी करण्यासाठी रावेरात येतात. जयवंता आजीच्या बातमीने महसूल प्रशासन दखल घेतली परंतु कमीत-कमी इतरांच्या वयाचे गांभीर्य लक्षात घेऊन इतर प्रलंबित प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्याची गरज आहे.

इतर लाभार्थी याद्याच्या प्रतीक्षेत
रावेर संजय गांधी निराधार योजनेत विविध योजनांसाठी जानेवारी ते जुलै दरम्यान 1200 प्रकरणे आली यातील जानेवारीत 214 प्रकरणे मंजूर करून यादी प्रसिध्द केले त्यानंतर तहसिल प्रशासनाने तब्बल सात महीन्यांनी पुन्हा 350 प्रकरणे मंजूर केले परंतु ऑगस्ट संपण्यात आला परंतु अजुन सुध्दा मंजूर प्रकरणाच्या याद्या प्रसिध्द झालेल्या नाही. तब्बल आठ महिन्यांपासून तालुक्यातील विविध जयवंता आजींसारख्या वृध्द व्यक्ती याद्या प्रसिध्द होण्याच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, जयवंता आजींचे खाते रावेर युनियन बँकेत असून ते बंद करून खिरवड गावातील बँकेत खाते उघडण्यात यावे तसेच तालुक्यातील इतर वृध्द व्यक्तींचेदेखील स्थानिक गावातच खाते उघडण्याची परवानगी मिळाल्यास त्यांचीदेखील पायपीट थांबणार आहे.

