भुसावळातील अमृत योजनेच्या 158 कोटींच्या सुधारीत प्रस्तावाला मान्यता देणार !


पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही : अधिकार्‍यांसोबत घेतली बैठक

भुसावळ : केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना असलेल्या अटल (अमृत) योजनेच्या 158 कोटींच्या नवीन सुधारीत आराखड्याला मंजुरी देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी बैठकीत दिली. शहरात अमृत योजनेचे काम अपूर्ण असल्याने नागरकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने शहरातील रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य असून नागरीकांना वेळेवर पाणीपुरवठादेखील करण्यास अडचणी येत आहेत. या समस्येची गंभीर दखल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेत जळगावच्या अजिंठा शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली. बैठकीत या योजनेच्या कार्यान्वयाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

अमृत योजनेचे शहरात काम रेंगाळले
भुसावळ शहरात 22 मे 2017 रोजी 90 कोटी 84 लाख 51 हजार रुपयांच्या अमृत योजनेला मान्यता देण्यात आली. यानंतर 26 ऑक्टोबर 2017 रोजी मे. जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड, जळगाव या कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली. या योजनेची मुदत दोन वर्षांची असली तरी मुदत संपून एक वर्ष उलटले तरी अद्याप योजनेचे काम पूर्णत्वाकडे आलेले नाही. यात योजनेतील 213 किलोमीटरपैकी 140 किलोमीटरच्या पाईपलाईनचे काम झालेले आहे. तर पाण्याच्या 11 टाक्यांपैकी 9 टाक्यांचे काम सुरू झालेले आहे. शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असले तरी कोविड-19चा प्रादूर्भाव आणि नंतर पावसाळ्यामुळे वितरण व्यवस्था व रस्त्यांची कामे खोळंबली आहेत. याआधी पाण्याचा स्त्रोत हा शहरातील तापी नदीच्या पात्रात होता. हा स्त्रोत बदलून शेळगाव बंधार्‍याच्या वरील भागात साकेगाव शिवारात घेण्यात आला असून यासाठी मजिप्रा नाशिक येथे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

मार्च नंतर सुधारीत कामास प्रारंभ
या पार्श्‍वभूमीवर सोमवारच्या बैठकीत मजिप्रातर्फे 90 कोटी ऐवजी सुधारीत 158 कोटी रूपयांचा नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अमृतच्या मूळ योजनेचे काम येत्या मार्च अखेरीस पूर्णत्वाकडे येऊन नंतर सुधारीत कामास प्रारंभ करण्यात येईल, असे या बैठकीत ठरविण्यात आले. यात जानेवारी 2021 पर्यंत वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण करावे आणि 8 जलकुंभ हे मार्च 2021 तर तीन जलकुंभ हे जुलै 2021 अखेरीस पूर्ण करावे, असे निर्देश जैन इरीगेशनला या बैठकीत देण्यात आले. परीणामी अमृत योजनेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठबळाने व आमदार संजय सावकारे यांच्या पुढाकाराने नवसंजीवनी मिळणार आहे.

यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला आमदार संजय सावकारे, आ.अनिल भाईदास पाटील, नगरसेवक मनोज बियाणी, मजिप्राचे अभियंता निकम, भुसावळचे मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार, प्रकल्प अभियंता वाघ, जैन इरीगेशनचे अधिकारी भिरूड आणि ललवाणी आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !