जुक्टो संघटना 4 रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देणार
20 वर्षानंतरही कनिष्ठ प्राध्यापकांच्या समस्या ‘जैसे थे’
भुसावळ : राज्य महासंघाच्या आदेशानुसार जुक्टो संघटना आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांना सनदशीर मार्गाने व कोरोना नियम पाळून मोजक्या संख्येने निवेदन सादर करणार आहेत. गेल्या वीस वर्षात राज्य सरकारने वेळोवेळी आश्वासन देऊनही कनिष्ठ प्राध्यापकांच्या प्रमुख समस्या सोडवल्या नाहीत, अनेक वेळा राज्य महासंघाच्या पदाधिकार्यांशी चर्चा करून केवळ आश्वासने दिली तसेच घोषणा करूनही राज्यातील शिक्षण मंत्र्यांनी महासंघाच्या पदाधिकार्यांची वेळोवेळी मीटिंग घेऊनही मागण्या न सोडवल्याने कोरोना काळातही संघटनेला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. येणार्या 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनावर बहिष्कार म्हणून काळ्या फिती लावणार आहेत.
अशा आहेत मागण्या
मूल्यांकन पात्र घोषित, अघोषित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेतन अनुदान देणे, केवळ दोष इत्यादीचा विचार न करता अघोषित यादीतील शिक्षकांना देखील हे अनुदान देण्यात यावे, दशकाहून अधिक काळ 2002 दोन 2003 पासून वाढीव पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना देखील पद मंजुरी व वेतन अनुदान देण्यात यावे, आय.टी.विषय शिक्षकांना वेतनश्रेणीत वेतन देण्यात यावे, सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासकीय कर्मचार्यांना 10, 20 व 30 वर्षाच्या सेवेनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी आदी मागण्यांबाबत राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी एकजूट करून हे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन जुक्टो संघटनेचे प्रा.शैलेश राणे, सचिव प्रा.नंदन वळींकार, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड, प्रा.डी.डी.पाटील, कार्याध्यक्ष प्रा.सुनील सोनार, प्रा.सुनील पाटील व सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी जुक्टो सभासदांना केले आहे.


