कंडारीत एटीएम फोडले : रक्कम सुरक्षित


पोलिस अधिकार्‍यांची धाव : बँक प्रशासनाकडून अद्याप फिर्याद नाही : तीन वर्षात चार घटना

भुसावळ : तालुक्यातील कंडारी गावातील ग्रामपंचायतीच्या शॉपींग सेंटरजवळील टाटा इंडिकॅश कंपनीचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला मात्र त्यांना सुदैवाने यात यश आले नाही. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एक संशयीत आरोपी एटीएमच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे तर संबंधित बँक प्रशासनाने अद्याप तक्रार दाखल केली नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. एटीएममध्ये नेमकी किती रक्कम आहे याबाबत माहिती कळू शकली नाही.

एटीएमचे नुकसान : रोकड मात्र सुरक्षित
तालुक्यातील कंडारी येथे टाटा इंडिकॅश कंपनीचे दोन एटीएम एकाच दालनात लावण्यात आले आहे. गुरूवारी मध्यरात्री 2.25 वाजेच्या सुमारास 30 ते 35 वयोगटातील एका संशयीत इसमाने वर्दळ नसल्याची संधी साधून एटीएम मशीन बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या वायरी कट करीत दालनातील एका मशीनच्या दरवाजासह टीव्ही संचाचे नुकसान करीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश न आल्याने हजारो रुपयांची रोकड सुरक्षित राहिली.

शहर पोलिसांना उशिरा मिळाली माहिती
शहर पोलिसांच्या हद्दीतील कंडारी येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतरही शहर पोलिसांना गुरुवारी दुपारी 12.15 वाजेच्या सुमारास हॉटेल व्यावसायीकाने माहिती दिल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व कर्मचार्‍यांनी धाव घेतली. एटीएम कंपनीच्या संबंधित इंजिनिअरला बोलावल्यानंत त्यांनी कंपनीच्या हैद्राबाद व मुंबई कार्यालयाला याबाबत कल्पना दिली मात्र संबंधित कंपनीने अद्याप तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे निरीक्षक ठोंबे यांनी सांगितले. एटीएममध्ये नेमकी किती रोकड सुरक्षित आहे व किती रुपयांचे नुकसान झाले हे कंपनीने माहिती दिली नसल्याने सांगता येत नसल्याचेही ते म्हणाले.

भुसावळसह तालुक्यात एटीएम फोडण्याच्या तीन घटना
सुमारे तीन वर्षांपूर्वी 13 जानेवारी 2018 रोजी मध्यरात्री भुसावळ-जळगाव रोडवरील पंचमुखी हनुमान मंदिरासमोरील अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी सुमारे तीन लाखांची रोकड लांबवली होती तर चोरीपूर्वी भुसावळातून चोरट्यांनी चारचाकी लांबवत त्याद्वारे एटीएम लांबवले होते. त्यानंतर डिसेंबर 201 मध्ये भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील नवशक्ती कॉम्प्लेक्समधील इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला होता व त्यावेळी रोकड सुरक्षित राहिली होती. त्यानंतर तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथे गतवर्षी पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन जाताच मुख्य मार्गावरील रा.धो. हायस्कूल परीसरातील आयडीबीआय बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी दरोडा टाकत सीसीटीव्ही कॅमेरे फोडून गॅस कटरचा वापर करीत तब्बल सहा लाख 41 हजार रुपयांच्या रोकडवर डल्ला मारला होता. विशेष म्हणजे तीनही घटनेतील चोरटे पकडण्यात पोलिस यंत्रणेला यश आलेले नाही.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !