मृतदेहाच्या अदला-बदलीने भुसावळातील नातेवाईकांना मनस्ताप


भुसावळ : शहरातील मुस्लीम कॉलनी भागातील 65 वर्षीय वृद्धेचा अति रक्तदाबाच्या त्रासानंतर मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात अंत्यसंस्कारासाठी देण्यात आल्यानंतर दफनविधीप्रसंगी अंत्यदर्शन घेताना मृत वयोवृद्धेऐवजी दुसर्‍याच महिलेचा मृतदेह निघाल्याने खळबळ उडाली. शहरात शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता मुस्लीम कब्रस्थानात हा प्रकार उघड झाल्यानंतर या प्रकाराला दोषी असणार्‍यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.

चक्क मृतदेहाची झाली अदलाबदल
झाले असे की, शहरातील मुस्लीम कॉलनीतील रहिवासी असलेल्या 65 वर्षीय वृद्धेला मंगळवारी उच्च रक्तदाब तसेच पांढर्‍या पेशी कमी झाल्याने रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती अत्यवस्थ झाल्याने बुधवारी त्यांना गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू ओढवला. याबाबतची माहिती नातेवाईकांना कळवण्यात आल्यानंतर शुक्रवारी सकाळी 11.10 वाजता रुग्णवाहिकेद्वारे भुसावळातील वृद्धेच्या घरी आणण्यात आला व तेथून कब्रस्थानात मृतदेह दफनभूमीत नेण्यात आला. यावेळी आईच्या देहाचे दफन करण्यापूर्वी तिचा चेहरा पाहण्याचा आग्रह मुलांनी धरला असता मृतदेह उघडून पाहिल्यानंतर हा मृतदेह दुसर्‍याच महिलेचा असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकाराने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती कळताच बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, तहसीलदार दीपक धीवरे, आमदार संजय सावकारे, माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू, हारून मन्सुरी आदींनी धाव घेतली व जमावाची समजूत काढली.

अखेर मृतदेह हलवला
प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकार्‍यांनी वृद्ध महिलेच्या नातेवाईकांची समजूत काढून हा मृतदेह गोदावरी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये परत पाठवण्यात आला तर भुसावळातील मयत महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवून तो पुन्हा भुसावळात आणण्यात आल्यानंतर दुपारी दफनविधी उरकण्यात आला तर भुसावळात पाठवण्यात आलेला मृतदेह जळगावच्या दादावाडी परीसरातील रहिवासी असलेल्या महिलेचा असल्याचे समोर आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !