मुक्ताईनगरातील कोविड सेंटरमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध


खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यश : गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार होण्यास होणार मदत

मुक्ताईनगर : कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात केंद्रीय समितीचे पथक पाठवण्याची मागणी आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे केली होती. त्या मागणीनुसार केंद्रीय आरोग्य समितीचे सदस्यांनी जळगाव जिल्ह्यात दौरा करून सर्व परीस्थितीचा आढावा घेतला होता व गंभीर रुग्णांना आवश्यक व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त आहे, असे निरीक्षण नोंदवले होते. अखेर खासदारांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगरातील कोविड सेंटरमध्ये व्हेंटीलेटर उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

खासदारांच्या पाठपुराव्याची दखल
कोरोनाच्या गंभीर रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे कारण गंभीर रुग्ण अधिक आणि व्हेंटिलेटर अगदी कमी, अशी अवस्था निर्माण होत आहे. यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभा क्षेत्रातील कोरोनाच्या गंभीर रुग्णासाठी तातडीने व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला यश मिळून पंतप्रधान सहायता निधीमधून मुक्ताईनगर येथे व्हेंटिलेटर मिळाले असल्याने आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळाली आहे.

व्हेंटीलेटरमुळे रुग्णांना मोठा दिलासा
रुग्णांमध्ये कोरोनासोबतच इतरही गंभीर स्वरूपाच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत त्यामुळे अशा रुग्णांची प्रकृती गंभीर असते परीणामी त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते त्यानुसार डॉक्टरही रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याचा सल्ला देतात परंतु सद्य:स्थितीत गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपलब्ध व्हेंटिलेटर अपुरे पडत आहेत. ऐनवेळी आवश्यक सुविधा न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. या व्हेंटिलेटरमुळे कोरोनाच्या गंभीर रूग्णांना दिलासा मिळून त्यांचा जीव वाचवता येईल, अशी आशा खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केली. मुक्ताईनगर येथील कोविड सेंटर येथे व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णांवर उपचारासाठी अडचणी येत होत्या. तसेच अनेक गंभीर रुग्ण व्हेंटिलेटर नसल्यामुळे जळगाव येथे पाठवावे लागत होते. मुक्ताईनगर पासून जळगाव 60 किलोमीटर असल्याने गंभीर रुग्णांना हलवणे सुद्धा जिकिरीचे होते. मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथे व्हेंटिलेटरचे लोकार्पण खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा परीषद सभापती जयपाल बोदडे, नगराध्यक्ष नजमा तडवी, भाजप तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, प्रभारी पंचायत समिती सभापती विद्याताई पाटील, सरचिटणीस सुनील काटे, तालुका उपाध्यक्ष निलेश मालवेकर, उपनगराध्यक्ष मनीष पाटील, जि.प.सदस्य वैशाली तायडे, जि.प.सदस्य निलेश पाटील, तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन, भाजयुमो विधानसभा क्षेत्रप्रमुख दत्ता पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, भाजयुमो सरचिटणीस मुन्ना बोंडे, भैय्या पाटील, उपाध्यक्ष जयेश कारले, शुभम काळे, बापू ससाणे, प्रदीप साळुंखे, प्रवीण पाटील, प्रसिद्धीप्रमुख शिवराज पाटील व मान्यवर उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !