केळी व्यापार्यांकडून शेतकर्यांची 14 लाखात फसवणूक
केळी उत्पादकांची यावल पोलिस निरीक्षकांकडे तक्रार
यावल : तालुक्यातील सांगवी खुर्द व रावेर येथील दोघा केळी व्यापार्यांनी शहरातील सहा तर तालुक्यातील नावरे येथील दोन अशा आठ केळी उत्पादकांची 13 लाख 51 हजार 642 रुपयांची फसवणूक केली असून त्याबाबतची व्यथा केळी उत्पादकांनी यावल पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हान यांच्याकडे मांडली. केळी खरेदीनंतर व्यापार्यांनी शेतकर्यांना दिलेल्या धनादेशाचा अनादरदेखील झाल्याने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
शेतकर्यांना व्यापार्यांकडून लाखोंचा गंडा
मार्च ते जून 2020 या दरम्यान शहरातील सहा तर नावरे येथील दोन केळी उत्पादकांची तालुक्यातील सांगवी खुर्द व रावेर येथील दोघा व्यापार्यांनी शेतकर्यांची केळी कापून त्यापोटी काही केळी उत्पादकांना अंशत: रक्कम देत उर्वरीत रकमेचे धनादेश दिले होते. शेतकर्यांनी बँकेत हा धनादेश वटवण्यासाठी टाकल्यानंतर त्याचा अनादर (बाऊन्स) झाला. केळी उत्पादकांनी वांरवार व्यापार्यांच्या भेटी घेवून पैशांची मागणी केली मात्र व्यापार्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या शेतकर्यांची झाली फसवणूक
यावलचे देवनाथ भावसिंग पाटील (एक लाख 52 हजार 604), डॉ.गणेश लक्ष्मण रावते (तीन लाख सात हजार 961), अरुणकुमार सुपडू खेडकर (दोन लाख 84 हजार 543), पराग विजय सराफ (एक लाख दोन हजार 294), संदीप सतीष वायकोळे (एक लाख), संभाजी काशीनाथ लावणे (17 हजार 970) तर तालुक्यातील नावरे येथील देविदास उदोसिंग पाटील (एक लाख 80 हजार 286), महेंद्र शिवाजी पाटील (दोन लाख 5 हजार 984 रुपये) या शेतकर्यांची एकूण 13 लाख 51 हजार 642 रुपयात फसवणूक केली असल्याचे शेतकर्यांनी पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तालुक्यातील सांगवी खुर्द येथील रवींद्र सपकाळ तर रावेर येथील सुभाष पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद आल्याने संपर्क होवू शकला नाही.
ते व्यापारी व कमिशन एजंट, परवानाधारक नाहीत
तक्रारदारांपैकी डॉ.गणेश लक्ष्मण रावते यांनी गेल्या आठ दिवसांपूर्वी बाजार समितीकडे तक्रार केली आहे. पडताळणी अंती संबधित कमिशन एजंट व रावेर येथील व्यापारी हे परवानाधारक नाहीत मात्र डॉ.रावते यांनी बाजार समितीच्या काट्यावर मोजमाप केले असल्याने त्यांना पुढील कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिले असल्याचे बाजार समितीचे सचिव स्वप्नील सोनवणे यांनी सांगितले.

