चाकरमान्यांसाठी पॅसेंजर वा मेमू रेल सुरू करा
रेल्वे सल्लागार समिती सदस्य परीक्षीत बर्हाटेंचे डीआरएम यांना पत्र
भुसावळ : कोरोना महामारीच्या काळात रेल्वे गाड्या ठप्प झाल्याने नोकरीनिमित्त अप-डाऊन करणार्या चाकरमान्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने त्यांना मोठा भूर्दंड सोसावा लागला मात्र आता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता काही रेल्वे गाड्या सुरू केल्या असून या गाड्यांमध्ये अप-डाऊन करणार्या चाकरमान्यांना सरकारी ओळखपत्र पाहून रेल्वे पासद्वारे प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य परीक्षीत बर्हाटे व डॉ.विजयकुमार धांडे यांनी डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याकडे केली आहे.
पॅसेंजर वा मेमू ट्रेन सुरू करण्याची मागणी
निवेदनाचा आशय असा की, भुसावळ येथे दीपनगर वीज निर्मिती केंद्र तसेच भुसावळसह वरणगावात ऑर्डनन्स फॅक्टरी असल्याने मोठ्या प्रमाणावर अप-डाऊन करणार्या कर्मचार्यांची संख्या अधिक आहे मात्र रेल्वे गाड्यांअभावी हे कर्मचारी खाजगी वाहनाने प्रवास करतात मात्र त्यासाठी मोठा खर्च होत असून ही बाब धोकेदायकदेखील आहे.कंपनीचे वा सरकारी ओळखपत्र दाखवून या कर्मचार्यांना सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये पासद्वारे प्रवास करण्याची मुभा द्यावी अन्यथा नाशिक ते अकोला तसेच जळगाव ते खंडवा दरम्यान पॅसेंजर गाड्या वा मेमू ट्रेन सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


