भुसावळातील राजकारणात डोईजड झाल्याने आपल्याविरुद्ध गुन्ह्यांचे षडयंत्र


राजू सूर्यवंशी ; लोकप्रतिनिधींकडून प्रांताधिकारी व पोलिस प्रशासनाचा वापर होत असल्याचा आरोप

भुसावळ- शहरातील काही राजकारण्यांच्या नादाला लागून माझ्याविरुद्ध प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर व बाजारपेठचे पोलिस निरीक्षक देविदास पवार हे संगनमताने नियोजनबद्ध षड्यंत्र रचून माझे राजकीय अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप माजी सभापती तथा रीपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परीषदेत केला.

हे तर विधानसभा निवडणुकीत निवडून न येण्यासाठीचे षडयंत्र
सूर्यवंशी पुढे म्हणाले की, वर्चस्व असलेला कार्यकर्ता व व्यवसायाने कंत्राटदार असल्याने आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असल्याने मला प्रांताधिकार्‍यांकडून कुणाच्या तरी सांगण्यावरून विविध प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध जातीचे बोगस दाखले दिल्याने मी त्यांच्याविरुद्ध वरीष्ठांकडे तक्रार केली असून माझ्यावर तक्रारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रव्य पवार कुठलीही शहानिशा न करता चुकीची तक्रार केल्यास खोटे गुन्हे माझ्यावर दाखल करीत होते. माझ्याविरूद्ध षडयंत्र रचून जर कुठेही बोगस गुन्हे दाखल झाल्यास मी व माझी नगरसेविका पत्नी पूजा सूर्यवंशी हे आत्मदहन करतील व जबाबदार ते दोघेच राहतील, असा इशाराही राजू सूर्यवंशी यांनी दिला आहे. याप्रसंगी रीपाइंचे नेते लक्ष्मण जाधव, सुनील अंभोरे, प्रकाश सोनवणे, विश्वास खरात, बाळू सोनवणे, पप्पू सुरडकर, आनंद सूर्यवंशी आदी उपस्थित होते. दरम्यान, याबाबत प्रांत चिंचकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पोलीस स्टेशन हे सर्वांसाठी खुले आहे. दिलेली तक्रार नियमानुसार नोंदवावी लागते. त्या तक्रारीत तथ्य नसल्यास आम्ही ती तक्रार रद्द करतो व न्यायालयात चार्जशीट पाठवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !