भुसावळात हद्दपारीचे उल्लंघण : अजय पथरोडला अटक


भुसावळ : शहरातील वाल्मीक नगरातील रहिवासी अजय परशुराम पथरोड याला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्यावर सुध्दा तो शहरात आल्याने बाजारपेठ पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांच्या कामात अडथळा आणला म्हणून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अजय पथरोडला हद्दपार करण्यात आल्यावर सुध्दा तो शहरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिस त्यास नोटिस बजाविण्यासाठी गेले असता, त्याने पोलिसांची नोटिस घेण्यास नकार देत पोलिसांना शिवीगाळ केली, पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला म्हणून पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजय पथरोडविरूध्द सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारपेठ पोलिसांनी पथरोड याला अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले. पथरोड शहरात आला असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्याने त्यांनी मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी तात्काळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील डीबी पथकातील पोलिस कर्मचार्‍यांना वाल्मीक नगरात सोमवारी सायंकाळी 7.30 वाजता पाठविले. यात सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, सहा.पोलिस निरीक्षक मंगेश गोटाले, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, सचिन चौधरी यांनी वाल्मीक नगरात जाऊन खात्री केली असता अजय पोलिसांना मिळून आला. याप्रकरणी पोलिसांनी त्यास अटक करून बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले. त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पथरोडला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहायक पोलिस निरीक्षक मंगेश गोटाले पुढील तपास करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !