मराठा समाजाचा सरसगट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा
बोदवड : मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड गेली अनेक वर्ष मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी लढा देत आहे. मागील काही काळामध्ये घटनेच्या 15/4 व 16/4 कलमा अंतर्गत मराठा समाजाला शिक्षण व नोकरी यामध्ये सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. त्या सवलतीचा लाभ घेत राहणे व मराठा समाजाचा ओबीसी समावेशासाठी लढत राहणे या प्रकारची भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतलेली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर घटनापीठाची मागणी करण्यात आली होती व त्यावेळीही संभाजी ब्रिगेडने हा धोका होण्याची शक्यता व्यक्त केली होती. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचा सरसगट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी वीर भगतसिंह विद्यार्थी परीषदेतर्फे बोदवड तहसीलदारांना करण्यात आली.
घटनेच्या चौकटीत द्यावे आरक्षण
निवेदनाचा आशय असा की, कायदेशीर पद्धतीने व घटनेच्या चौकटीत बसेल, असे आरक्षण समाजाला द्यायचे असेल तर मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून ओबीसी प्रवर्गाची टक्केवारी वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे.गेले कित्येक दिवस झाले संघटनेची ही मागणी घटनेला धरून आहे. यावर सरकारनें गंभीरपणे विचार करावा अन्यथा येणार्या काळात यासाठी संघटनेच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने आंदोलन केले जाईल व सरकार पक्षाने तातडीने लक्ष घालून ही मागणी मान्य करावी, असे निवेदनात नमूद आहे. निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अनंता वाघ, विद्यार्थी परीषदेचे तालुकाध्यक्ष शैलेश वराडे, विशाल तांगडे, गोपाल पाटील, गजानन पाटील, अक्षय शेळके, केशव देशमुख, निखील सुरवाडे, मंगेश भोई, अजय माळी व समाजबांधव उपस्थित होते.


