भुसावळ लाच प्रकरण : हवालदार छोटू वैद्य यांची जामिनावर सुटका
भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागाचा कर्मचारी छोटू माणिकराव वैद्य (खोटे नगर, जळगाव) यास बुधवारी रात्री साडेनऊ वाजता 40 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. आरोपीस सुरुवातीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती तर कोठडी संपल्याने त्यास शनिवारी पुन्हा न्या.पी.व्ही.चिद्रे यांच्या न्यायासनापुढे हजर करण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने संशयीतास न्यायालयीन कोठडी सुनावली व 25 हजारांच्या जात मुचलक्यासह दर सोमवारी जळगाव एसीबी कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे अॅड.जगदीश कापडे, अॅड.चरणजित सिंग व अॅड.मनीष सेवलानी यांनी काम पाहिले.