भुसावळात जनता कर्फ्यूला अल्प प्रतिसाद
भुसावळ तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजार दोनशे पार : कोरोना नियंत्रणाचे आव्हान कायम
भुसावळ : शहरात कोरोनाबाधीतांची संख्या तब्बल दोन हजार दोनशे पार झाली असून सातत्याने वाढणार्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात आठवड्यातून मंगळवारी व शनिवारी स्वयंस्फूर्तीने व्यापार्यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला होता मात्र गेल्या काही आठवड्यांपासून शनिवारीदेखील व्यापार्यांनी दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतला होता तर दोन दिवसांपूर्वी शहर व्यापारी असोसिएशनर्फे शनिवार, 12 सप्टेंबर रोजी पुन्हा लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन सोशल मिडीयाद्वारे करण्यात आले मात्र शहरातील तुरळक व्यापार्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. शहरातील अनेक भागात विविध व्यावसायीकांची दुकाने सुरू होती तर हातगाडी विके्रतेही रस्त्यांवर थांबून असल्याचे दिसून आले.
शंभरावर रुग्णांचे मृत्यू
भुसावळ शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, शुक्रवारअखेर भुसावळ तालुक्यात 2151 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 102 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर शनिवारीदेखील त्यात भर पडल्याने रुग्ण संख्या पुन्हा वाढली आहे. गेल्या महिना भरापासून शनिवारी होणारा जनता कर्फ्यू पाळला जात नव्हता मात्र शुक्रवारी भुसावळ शहर व्यापारी असोसिएशने मंगळवार व शनिवारी शहरात जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन केल्यानंतर मुख्य बाजारपेठेतील नृसिंह मंदिर मार्ग, अप्सरा चौक, सराफ बाजार, मरीमाता मंदिर परिसर, लक्ष्मी चौक, मॉर्डनरोड, स्टेशनरोड, तापीरोड, जामनेररोड आदी भागातील निम्मे दुकाने बंद होती. या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. रस्त्यांवर हॉकर्स बांधवांची दुकाने मात्र कायम होती.

दुपारनंतर व्यापार्यांकडून दुकाने बंद
शहरात शनिवारी बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी दिसून आली. कोरोना नियंत्रणासाठी शहरात मंगळवार आणि शनिवारी 100 टक्के जनता कर्फ्यूचे पालन होणे अपेक्षित आहे मात्र काही व्यापारी, दुकानदारांकडून दुकाने उघडली जात असल्याने व्यापार्यांनी परीस्थितीचे गांभीर्य ओळखणे गरजेचे आहे शिवाय ग्राहकांनीदेखील शासनाच्या नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. शनिवारी दुकाने उघडूनही ग्राहक नसल्याने बर्याच दुकानदारांना दुपारनंतर आपली दुकाने बंद करावी लागली.
पालिका पथकाची कारवाई थंडावली
शहरात मास्क विना फिरणार्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे त्यातच कारवाईसाठी पालिकेचे पथक असले तरी या पथकाकडूनही कारवाई केली जात नसल्याने नागरीकांचे फावले आहे. दुकान, मॉलमध्ये जाणार्या ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सचे पालन केले जात नाही हीच परीस्थिती शहरातील आठवडे बाजारातील भाजी बाजारातही दिसून येते त्यामुळे पालिका पथकाने मरगळ झटकून कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे.

