दुचाकी चोरीस गेली अन् विवंचनेत प्रौढाची रेल्वेखाली आत्महत्या


शिवकॉलनी उड्डाणपूलाजवळील घटना : अनोळखी व्यक्तीने नजरचुकीने नेलेली दुचाकी मिळाली ः

जळगाव : शहरातील श्रध्दा कॉलनी येथील विजय छगन अहिरे (49, रा. श्रध्दा कॉलनी) यांनी शिवाजी उड्डाणपूलाजवळ अप रेल्वेलाईनवर रेल्वेच्या समोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास घडली. विजय अहिरे हे दुपारच्या सुमारास गिरणा टाकीचौकीजवळील चौकात आले असतांना त्यांची दुचाकी चोरीला गेली होती. यानंतर दुचाकी चोरी झाल्यामुळे कुटुंबियांना काय उत्तर द्यायचे या विवंचनेत त्यांनी थेट रेल्वेरुळ गाठले. व याठिकाणी आत्महत्या केली, अशी माहिती विजय अहिरे यांचा पुतण्या होमगार्ड कल्पेश अहिरे (रा.नशिराबाद) याने बोलतांना दिली आहे.

दुचाकी चोरीच्या विवंचनेत आत्महत्या
शहरातील श्रध्दा कॉलनी येथे विजय अहिरे हे कुटुंबासह वास्तव्यास होते. ते एस.टी.वर्कशॉपमध्ये नोकरीला होते. शनिवारी दुपारी अहिरे हे खाजगी कामासाठी घरुन गिरणा टाकीजवळील चौकात आले. याठिकाणी त्यांची दुचाकी उभी केली. काम आटोपून झाल्यावर अहिरे हे दुचाकीजवळ आले, असता त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र मिळून आली नाही. दुचाकी चोरी गेल्याने पत्नीसह मुलांना काय उत्तर द्यावे, काय सांगायचे या विवंचनेत अहिरे यांनी शिवकॉलनी उड्डाणपूलाजवळ रेल्वेलाईन गाठली. शिरसोली जळगाव अपलाईन खांबा क्रमांक 417/26/26 याठिकाणी येणार्या रेल्वेगाडीसमोर झोकून देत आत्महत्या केली.

अनोळखी नजरचुकीने घेवून गेला होता दुचाकी
विजय अहिरे यांच्या दुचाकीप्रमाणे एकाच रंगाची व कंपनीची दुचाकी त्यांच्या दुचाकीशेजारी उभी होती. अनोळखी व्यक्तीने आपलीच दुचाकी समजून अहिरे यांच्या दुचाकीला चाबी लावली व निघून गेला. यानंतर अनोळखी व्यक्तीला आपण आणलेली दुचाकी आपली नसल्याने तिच्या क्रमांकावरुन कळाले. त्यानंतर संबंधित तरुणाने थेट दुचाकी रामानंदनगर पोलीस ठाण्यात आणून दिली. विजय अहिरे हे पुन्हा घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने चुलतभाऊ कल्पेश अहिरे यास कळविले. कल्पेश नशिराबादहून थेट रामानंदनगर पोलीस ठाण्यात पोहचला. याठिकाणी त्याने विचारणा केली, असता तोपर्यंत पोलिसांना रेल्वेरुळावर आत्महत्या केल्याचे कळाले. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज इंद्रेकर यांच्यासह राजेश भावसार यांनी कर्मचार्यांनी कल्पेशसह घटनास्थळ गाठले असता, कपडे, चप्पल तसेच खिशातील पाकिट व त्यातील कागदपत्रावरुन ते आपलेच काका विजय अहिरे असल्याचे लक्षात आले. त्याने ही माहिती ककाकूसह कुटुंबियांना कळविली.

दुचाकी मिळाल पण…
घटनास्थळी दुचाकी नसल्याने कल्पेशने पोलिसांना विचारणा केली असता, सायंकाळी एक तरुण दुचाकी लावून गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस ठाण्यात आले असता, दुचाकी ही विजय अहिरे यांचीच असल्याचे निष्पन्न झाले. दुचाकी चोरीस गेल्याच्या टेन्शनमध्येच काका विजय अहिरे यांनी आत्महत्या केली असावी, अशी माहिती त्यांचा पुतण्या कल्पेश अहिरे बोलतांना दिली. घटनास्थळावर पंचनामा करुन मनोज इंद्रेकर, विजय भावसार यांनी मृतदेह गुलाबराव देवकर आयुर्वेद महाविद्यालयात हलविला. मयत विजय अहिरे यांच्या पश्चात पत्नी निता, मुलगा स्वप्निल आणि मुलगी प्रियंका असा परीवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मनोज इंद्रेकर आणि राजेश भावसार करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !