अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार : आरोपीला 14 वर्ष सश्रम कारावास
जळगाव : 11 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सुभाष हरचंद महाजन (55, रा.वाडे, ता.भडगाव) याला जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या.आर.जे.कटारीया यांनी गुरुवारी 14 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. किराणा दुकानावर जाण्याच्या बहाण्याने 11 वर्षीय मुलीला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना 18 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 11.30 वाजता घडली होती. आरोपी सुभाष हरचंद महाजन याने पीडित बालिकेला किराणा दुकानावर जाण्याच्या बहाण्याने घरी बोलावले व दरवाजा बंद करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडितेच्या वडीलांनी भडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरुन कलम 376 (2)(आय)(एच) व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
आरोपीला 14 वर्ष सश्रम कारावास
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे 9 साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडितेची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारतर्फे अॅड.चारुलता बोरसे यांनी प्रभावी युक्तीवाद करुन वाईट कृत्याच्या परीणामाबाबत समाजात योग्य संदेश जावा यासाठी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती केली. न्यायालयासमोर आलेले पुरावे व अॅड.बोरसे यांचा युक्तीवाद पाहता न्यायालयाने महाजन याला दोषी ठरविले व 14 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीतर्फे अॅड.मुकेश शिंपी यांनी कामकाज पाहिले.


