बोदवडमध्ये गॅस ग्राहकांची लूट
बोदवडमधील रक्षा इण्डेन एजन्सीबाबत तक्रारी : जिल्हाधिकार्यांनी दखल घेण्याची अपेक्षा
बोदवड : भारत पेट्रोलियम, हिन्दुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल कंपनीने गॅस ग्राहकांना सिलिंडररची डिलेव्हरी देताना वितरण शुल्क घेतल्यास कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट कारवाईचे आदेश दिले असताना बोदवड शहरातील रक्षा इंडियन इंडियन ऑइल कंपनीतर्फे शहर तथा तालुक्यातील ग्राहकांना सिलिंडरची डिलेव्हरी देताना वितरण चार्जेस घेतले जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. सहाशे रुपये सिलिंडरची किंमत असताना वितरणापोटी (डिलेव्हरी) 50 रुपये अतिरीक्त घेतले जात आहेत.
गॅस ग्राहकांनी केली तक्रार
मौजे शेवगे बुद्रुक येथील सुशीलाबाई लहेनसिंग पाटील (उज्वला योजना लाभार्थी) व मीनाबाई दिनकर पाटील ग्राहक यांनी गावात रक्षा इंडियन वाहन आले असता सिलेंडर मिळावे यासाठी सिलेंडर वितरण करणार्या इसमास सांगितले असता आधी नोंदणी करावी त्यानंतर सिलेंडर मिळेल, असे उत्तर मिळाले. त्यानंतर ग्राहकांनी ऑनलाइन बुकिंग केली मात्र तरीही त्यांना सिलेंडर देण्यात आले नाही. सिलेंडर हवे असल्यास सहाशे पन्नास रुपये द्यावे लागतील,असे सांगण्यात आले असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. वितरण शुल्क न घेता सिलेंडर सहाशे रुपयांमध्ये द्याव,े असे जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना या आदेशाची पायमल्ली होत आहे. या प्रकाराकडे पुरवठा अधिकारी यांच्यासह जबाबदार अधिकारी तसेच तहसीलदार यांचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

लोकप्रतिनिधींकडे तक्रार
शेवगे बुद्रुक येथील प्रकाराबाबत गावातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष लालसिंग पंडित पाटील यांनी तहसीलदार हेमंत पाटील यांची भेट घेत सदरील प्रकार लक्षात आणून दिला मात्र तुम्ही लेखी तक्रार करा कारवाई करू, असे बोलून वेळ मारून नेण्यात आली, असेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकाराची सखोल चौकशी होऊन वितरकांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत तरतुदीनुसार कारवाई करावी, अशी मागणी लालसिंग पाटील यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती आमदार चंद्रकांत पाटील व तहसीलदार बोदवड यांना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला टोपली
सप्टेंबर महिन्यात इंडियन ऑईल, हिन्दूस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांनी वितरण शूल्क घेचू, नये असे स्पष्ट निर्देश वितरकांना दिले होते. याबाबत जिल्हाधिकार्यांनीही आदेश जाहीर केले होते परंतु बोदवड शहरातील रक्षा इण्डेनच्या वितरकाकडून 17 पर्यंत ग्राहकांकडून अतिरिक्त 50 रुपये प्रती सिलेंडर मागे घेतल्या गेल्याने जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे तसेच गावामध्ये रस्त्यावर व चौकात तसेच त्यांच्या एजन्सीच्या गोडाऊनमधून ज्या ग्राहकांना सिलेंडर दिल्या गेले त्यांना सुद्धा ग्राहकांना 27 रुपये 50 पैसे वितरकाने परत केलेले नाही. त्यामुळे सुरुवातीपासून ते आज रोजी पर्यंत घेण्यात आलेला 50 रुपये अतिरिक्त चार्ज व 27 रुपये 50 पैसे परत देण्यात यावे, अशी प्रतिक्रिया लालसिंग पाटिल यांनी दिली.

