बोदवडमध्ये ‘जनता कर्फ्यू’ला उत्स्फूर्त प्रतिसाद


बोदवड : ‘कोरोना’ विषाणूचा कहर रोखण्यासाठी प्रशासनासह विविध घटकांनी स्वयंस्फूर्तीने पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला पहिल्या दिवशी शनिवारी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येने अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात 16 रोजी गांधी चौकात व्यापारी, पोलिस प्रशासन, नगर प्रशासन, महसूल विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. त्यात बोदवड शहरात 19 व 20 सप्टेंबर असे दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ची हाक देण्यात आली होती. त्याला आज पहिल्या दिवशी शनिवार, 19 रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात मेडिकल, दूध व वैद्यकीय सुविधा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद होती. अधूनमधून पोलिस, महसूल व नगरपंचायतीचे पथक शहरात गस्त घालत होते. शहरात पुकारलेल्या बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट होता, रस्त्यावर वाहतूकही दिसून आली नाही. दरम्यान, नागरीकांनी शनिवारप्रमाणेच रविवारीदेखील जनता कर्फ्यू उत्स्फूर्तपणे पाळावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !