साकळीत जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद
साकळी : गावातील कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी तसेच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दर रविवारी साकळीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यास साकळीकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. रविवारी बाजाराच्या दिवशी संपूर्ण गाव बंद करून जनता कर्फ्यू पाळण्यात यावा याबाबतचा निर्णय 17 सप्टेंबर रोजी लोकप्रतिनिधी व व्यावसायीकांच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार सरपंच सुषमा पाटील यांच्या वतीने जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानुसार आवाहनाला प्रतिसाद देत रविवार, 20 रोजी संपूर्ण साकळी गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले.
साकळीत निरव शांतता
दुपारच्या वेळी तर सर्वत्र अगदी नीरव शांतता होती. या बंद दरम्यान सर्व गावातील व्यवसायीकांनी अत्यावश्यक सुविधांसह विविध प्रकारच्या व्यवसायांची छोटी-मोठी दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवली त्याचप्रमाणे इतर नागरीकांची सुद्धा वर्दळ फार अत्यल्प होती. ज्यांना अत्यावश्यक काम आहे असेच नागरिक घराबाहेर पडत होते. या बंद दरम्यान गावातील ग्रामपंचायत प्रशासनासह पोलीस व महसूल प्रशासन सुद्धा लक्ष ठेवून होते. यापुढे साकळी गावात प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून तो कोरोनाची परीस्थिती आटोक्यात येत नाही तो पर्यंत कायम राहणार आहे. यापुढच्या काळातही ग्रामस्थ व व्यावसायीकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सरपंच सुषमा पाटील यांनी केले आहे.


