वारकरी पदाधिकार्यांशी वंचित बहुजन आघाडीचा संवाद
कीर्तनांसह भजने म्हणण्यास ग्रीन झोनमध्ये परवानगी देण्याची मागणी
भुसावळ : तालुक्याील सुसरी येथील विठ्ठल मंदिरात शनिवारी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी ह.भ.प.समुहातील वारकरी पदाधिकारी संजय महाराज, सुदाम पाटील, गिरीधर चौधरी, प्रभाकर पाटील, शेनु पाटील, शांताराम तळेले यांच्याशी संवाद साधला. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा सचिव संजय सुरडकर, प्रमोद बावस्कर,नितीन इंगळे, नितीन मेघे उपस्थित होते.
कीर्तन भजनांना द्यावी परवानगी
याप्रसंगी सरकारने लोकांच्या मनात नवचैतन्य निर्माण होण्यासाठी कीर्तन, भजन करण्यास ग्रीन झोन भागात परवानगी द्यावी, सरकारने सर्व व्यवसाय नियम व अटी घालून सुरू केले आहेत शिवाय सर्व दारूचे दुकाने सुरू असून उघड्यावर मांस विक्रीदेखील होत आहे त्यामुळे मोठी गर्दी वाढली आहे. मंत्री महोदयांच्या बैठकांमध्ये पन्नासवर लोक उपस्थित असतात त्यामुळे कुठेही सुरक्षित अंतर दिसून येत नाही मात्र दुसरीकडे सरकार वारकर्यांवर अन्याय करताना दिसून येत आहे. आज समाज प्रबोधनाची समाजाला जास्त गरज आहे. कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम व मंदिर सर्व बंद आहेत. आज खरा विचार केला असता समाजातील लोकांची मानसिकता खूप खचलेली दिसून येत आहे, लोक माणुसकी सोडून धर्म सोडून फक्त राजकारण करतांना जास्त दिसून येत आहेत. वारकरी संप्रदायातील संत हे शिस्तबद्ध नियमबद्ध कीर्तन करत असताना सरकार कीर्तन-भजनाला परवानगी का देत नाही ? असा प्रश्न इउपस्थित करण्यात आला. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संतांनी समाजाला योग्यच मार्गदर्शन केले आहे. जगावर कितीही संकट आले तर ते फक्त भजन, कीर्तन केल्यानेच दूर होते त्याकरीता भक्तिभाव फार गरजेचे असून भजन-कीर्तनांना परवानगी द्यावा, असा सूर उमटला.


