किसान रेलतर्फे तीन हजार 169 शेती उत्पादणांची वाहतूक
भुसावळ : मध्य रेल्वेतर्फे 7 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान किसान रेलच्या 12 फेर्यांद्वारे तीन हजार 169 टन शेती उत्पादन व इतर पार्सलची वाहतूक करण्यात आली. रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेवर भारताची पहिली किसान रेल 7 ऑगस्टपासून देवळाली ते दानापूर दरम्यान सुरू केली आहे. या भागातील शेतकर्यांना त्यांचा शेतीमाल देशाच्या दुर्गम भागात त्वरीत आणि आर्थिकदृष्ट्या परवडणार्या दरात पाठवण्यासाठी मदत होण्यासाठी साप्ताहिक ट्रेन म्हणून सुरू करण्यात आल्यानंतर शेतकर्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. नंतर ही गाडी मुझफ्फरपूरपर्यंत वाढविण्यात आली आणि मुख्य किसान रेल्वेला जोडण्यासाठी लिंक किसान रेल सांगोला/पुणे येथूनही सुरू झाली. किसान रेल आता 8 सप्टेंबरपासून आठवड्यातून तीन दिवस धावत आहे. आतापर्यंत किसान रेलने 12 फेर्या पूर्ण केल्या. ज्यामध्ये डाळिंब (अनार), शिमला मिरची, हिरवी मिरची, आले, लिंबू, बर्फ-मासे आणि इतर पार्सल यासारख्या तीन हजार 169 टनाहून अधिक नाशवंत मालाचा समावेश आहे. सोलापूर विभागातील सांगोला, मोडलिंब, बेलवंडी, बेलापूर आणि कोपरगाव स्थानकांवर पीओएस मशीनन बसविण्यात येऊन किसान रेलमध्ये शेती उत्पादनांची बुकिंग करण्यासाठी एक नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्याचा सुलभ व त्वरीत व्यवहारासाठी शेतकर्यांना फायदा होत आहे.

