वर्तमानपत्रामुळे कोरोना होत नाही ; कोरोना संकटात वृत्तपत्र हेच आपले खरे मित्र
माहिती उपसंचालक रणजितसिंह राजपूत : जिल्हाधिकार्यांच्या नावाने फिरणारा संदेश खोटा व समाजात भ्रम निर्माण करणारा
नाशिक : वृत्तपत्र वाचल्याने, हातात बाळगल्याने कोरोना होत नाही, कोरोना संकटाच्या काळात समाजात अधिकृत, वस्तुनिष्ठ माहिती ही वृत्तपत्रांच्याच माध्यमातून दिली जात आहे. सर्वत्र कोरोनाविषयीची भिती व गैरसमज पसरविण्याचे काम होत असताना वर्तमानपत्रांनी मात्र सामाजिक भान व समतोल राखत वस्तुनिष्ठ व अधिकृत माहिती देत शासन-प्रशासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून समाज प्रबोधनाचे काम अत्यंत जबाबदारीने केले, या संकटकाळात माणसांमध्ये सकारात्मक जाणिवा निर्माण करण्याचे काम देखील ते करत आहेत. वृत्तपत्र हेच आपले मित्र आहेत. त्यामुळे आफवांना बळी न पडता वृत्तपत्र नियमित वाचायला हवीत, असे आवाहन नाशिक विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक रणजितसिंह राजपूत यांनी केले आहे.
वृत्तपत्र पूर्णपणे सुरक्षित आणि कोरोनामुक्त
‘कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयांच्या नावाने नाशिकसह विभागातील अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार या जिल्ह्यांत व्हाट्स प व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटक व खोडसाळ प्रवृत्तीचे लोक पसरवत आहेत. त्यात प्रामुख्याने आपल्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तु बंद करणे, त्यांच्या हाताळणी, बाळगणे, व काळजी घेण्याबरोबरच ‘वृत्तपत्रे बंद करा. नाहीच जमले तर एका ट्रे मध्ये चोवीस तास हात न लावता ठेवा. दुसर्या दिवशी वाचा,’ अशा आशयाची अशास्त्रिय, अशुद्ध, निराधार माहिती देण्यात आली आहे. वृत्तपत्रामुळे कोरोना झाल्याचे एकही उदाहरण नाही, तसेच कोरोनाचा संसर्ग हा वृत्तपत्रांमुळे होत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आधीच स्पष्ट केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सुध्दा वृत्तपत्रांमुळे कोरोनाची लागण होत नसून वृत्तपत्र ही पूर्णपणे सुरक्षित आणि कोरोनामुक्त असल्याचे सांगितले आहे. काही ठिकाणी वृत्तपत्रांची छपाई ही मानवी स्पर्शाशिवाय केली जाते आणि वृत्तपत्रांच्या छपाई दरम्यान त्यावर सॅनिटायझेशन केले जाते. वृत्तपत्र विक्रेते देखील सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करतात. त्यामुळे त्यांच्यापासून सुध्दा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाही. त्यामुळे खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी वृत्तपत्र स्वत: हाताळून, बाळगून तसेच प्रसंगी सॅनिटाईज करून त्याचे वाचन करावे. त्यामुळे सत्य,अचूक आणि सविस्तर बातम्यांसाठी वृत्तपत्रांची आपल्याला मदतच होत असते. वृत्तपत्र वाटप करणार्यांनीही तोंडाला मास्क लावावे. सॅनिटायझरचा नियमित वापर करावा व वाचकांनीही तशी काळजी घ्यावी असेही आवाहन उपसंचालक राजपूत यांनी केले आहे.

अफवांवर ठेवू नका विश्वास
दुधाच्या पिशव्या, वर्तमानपत्रे या वस्तूंच्या माध्यमातून कोरोनाचा विषाणू पसरण्याची शक्यता नाही. त्यामुळे सोशल मीडियातील अफवांवर विश्वास ठेवू नका. कोरोना केवळ बाधित व्यक्तींच्या संपर्कातून होतो तरीही या आजाराबाबत सोशल मीडियावर चुकीची, कोणतीही शास्त्रीय आधार नसलेली माहिती शेअर करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. वृत्तपत्रे, दुधाच्या पिशव्या आदी वस्तूंच्या माध्यमातून हा विषाणू पसरतो, अशी अफवा यामुळेच पसरली आहे. त्यातून काही गृहसंकुलांनी दूधविक्रेते आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना मनाई करण्याचे प्रकार घडत आहेत. वाचन ही आपली समृद्ध संस्कृती आहे, ती वर्तमानपत्राच्या माध्यमातून जपण्याचे कार्य सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावर आपण करत आलो आहोत. ही संस्कृती जपण्याचे आणि वृद्धींगत करण्याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे, वृत्तपत्र ही आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन जगण्याचा, भविष्याची दिशा ठरवण्याचा अविभाज्य घटक आहे. ‘माझे कुटुंब व माझी जबाबदारी’ च्या मोहिमेत आपण जबाबदार कुटुंबाचे घटक म्हणून वृत्तपत्र वाचून वाचन संस्कृती बळकट करूया, असेही आवाहन राजपूत यांनी केले आहे.

