दीपनगरात शॉर्ट सर्कीटमुळे महानिर्मितीचा कर्मचारी भाजला
हॉपर हिटरच्या दुरुस्तीदरम्यानची घटना
भुसावळ : दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या 500 मेगावॅट संचांत हॉपर हिटरच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे 30 वर्षीय कर्मचारी भाजल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या कर्मचार्यावर भुसावळातील खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर जळगावच्या आर्चीड रुग्णालयात हलविण्यात आले. दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील 500 बाय दोनच्या संचातील हॉपर हिटर दुरुस्तीचे काम केले जात होते. याच दरम्यान अचानक शॉर्टसर्किट झाल्याने महानिर्मितीचा कर्मचारी सचिन शिंदे (30, रा.दीपनगर) हा भाजला गेला. त्याच्या डावा हात, चेहरा, डोक्यावरील केस जळाले. त्यात सहकारी कर्मचार्यांनी तत्काळ भुसावळ येथील रीदम हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. त्याच्यावर प्रथमोचार करून त्यास जळगाव येथील आर्चीड हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कर्मचार्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दीपनगरात सातत्याने किरकोळ अपघात घडतात. यामुळे कर्मचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. दरम्यान जखमी सचिनचे लग्न ठरले असून आगामी दोन, तीन महिन्यांत लग्न होणार होते, यापूर्वीच हा अपघात झाला, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

