केळी उत्पादकांची फसवणूक : दोघा व्यापार्यांना अटक
जळगाव : केळी उत्पादक शेतकर्यांकडून केळी खरेदी करुन पैसे न देता फसवणूक करणार्या दोन व्यापार्यांना तालुका पोलिसांनी सोमवारी अटक केली तर दोन संशयीत अद्याप बेपत्ता आहेत. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
अशोक रघुनाथ पाटील (53, रा.निंभोरा, ता.रावेर) व सय्यद गंभीर सय्यद सांडू ( 60, रा.सावदा, ता.रावेर) असे अटक केलेल्या संशयित व्यापार्यांची नावे आहेत. तर फिरोज गंभीर तडवी (रा.अमोदा, ता.यावल) व सय्यद इब्राहीम सय्यद गंभीर (रा.सावदा, ता.रावेर) हे दोन संशयीत बेपत्ता आहेत.
तालुका पोलिसांनी केली अटक
गतवर्षी दाखल पहिल्या गुन्ह्यात नारायण तुकाराम सोनवणे (रा.धानोरा बु, ता.जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. सोनवणे यांची 1 लाख 38 हजार 334 रुपयांची केळी अशोक पाटील या व्यापार्याने खरेदी केली होती. परंतू, त्याचे पैसे दिले नव्हते. सोनवणे यांनी पैसे मागीतले असता पाटील बेपत्ता झाला होता. अखेर सोनवणे यांनी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार दाखल गुन्ह्यात पाटील याला अटक करण्यात आली. तर दुसरा गुन्हा 16 सप्टेंबर 2020 रोजी दाखल करण्यात आला. यात बाळु प्रेमराज पाटील (रा.गाढोदा, ता.जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. बाळु पाटील यांची 1 लाख 41 हजार 389 रुपयांची केळी सय्यद गंभीर सय्यद सांडू याच्यासह तीघांनी खरेदी केली होती. परंतू, पाटील यांचे पैसे न देता तीघेजण बेपत्ता झाले होते. यातील सय्यद गंभीर याला सोमवारी तुलका पोलिसांनी अटक केली.


