तरूणावर चॉपर हल्ला : चौघांना अटक
जळगाव : अंत्ययात्रेत खुन्नस दिल्यावरून 13 सप्टेंबर रोजी उमाळे येथे दोन गटात तालुक्यातील कुसुंबा येथे गँगवार झाला होता. यात एकावर चॉपरने वार करण्यात आल्यानंतर जखमीस खासगी रूग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, त्याच खासगी हॉस्पिटलसमोर एकावर आठ ते दहा जणांनी चॉपरने हल्ला केला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील चार जणांना जिल्हा पेठ पोलीसांनी अटक केली आहे.सोनू उर्फ कुलदिप पोपट आढळे (28, रा. समता नगर), मुकेश उर्फ पप्पू रमेश शिरसाठ (22, रा.हुडको पिंप्राळा), अजय देविदास सपकाळे (21, रा.बुध्द विहार हुडको, पिंप्राळा) आणि राकेश अशोक सपकाळे (22, रा.समता नगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
खुन्नस दिल्यावरून झाला होता वाद
अधिक माहिती अशी की, 13 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास तालुक्यातील कुसुंबा येथे मित्राच्या अंत्ययात्रेत दोन गँग समोरासमोर आल्याने एकमेकांना खुन्नस दिली गेली. अंत्ययात्रा संपताच परतीच्या मार्गावर या दोन्ही गँग एकमेकांवर तुटून पडल्या. त्यात चॉपर, लोखंडी सळई, दगडांचा वापर करुन एकमेकांवर हल्ले चढवले गेले. दोन जण गंभीर जखमी झाले. यातील एका जखमी तरुण बसस्थानक परीसरातील डॉ. भंगाळे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकाच वेळी दोन्ही गट येथे दाखल झाल्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला. दरम्यान, यावेळी पुन्हा एकदा दोन्ही गट एकमेकांना भिडले. जखमी झालेल्या किरण खर्चे याच्या गटाला मदत करण्यासाठी आलेल्या खिलेश पाटील तरुणावर या ठिकाणी गटाकडून चॉपरने वार करण्यात आले होते. त्यामुळे हा तरुण देखील जखमी झाला. त्याने हल्ला करणार्यांच्या विरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला होता. हा प्रकार परीसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. या आधारावर जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात नाना तायडे यांच्या फिर्यादीवरून आठ ते दहा जणांविरोधात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक किशोर पवार, हवालदार जितेंद्र सुरवाडे, नाना तायडे, अविनाश देवरे यांनी कारवाई करत संशयीत आरोपी कुलदिप आढळे, मुकेश शिरसाठ, अजय सपकाळे, राकेश सपकाळे यांना अटक केली.


