कामावर श्रद्धा ठेवा, श्रद्धाच तुम्हाला सन्मान मिळवून देईल


महामंडलेश्वर आचार्य श्री जनार्दनहरीजी महाराज : यशस्वी विद्यार्थ्यांना पारीतोषिक वितरण1

फैजपूर : आपल्या कामावर श्रद्धा ठेवा, ही श्रद्धाच तुम्हाला सन्मान मिळवून देईल, तुम्ही तुमच्या कलेवर श्रध्दा ठेवली म्हणून आजचा सन्मान तुम्हाला मिळाला शिवाय संत आणि मंदिरे ही सर्वांसाठी खुले आहेत. याचा व्यासपीठ म्हणून उपयोग करावा, असे आवाहन महामंडलेश्वर आचार्य श्री जनार्दनहरीजी महाराज यांनी केले. श्री.आ.गं.हायस्कूल व श्री.ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सावदा येथील विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सवानिमित्ताने घेण्यात आलेल्या ऑनलाईन गणेश मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारीतोषिक देवून गौरवण्यात आले. याप्रसंगी जनार्दन महाराज बोलत होते.

सतपंथ मंदिर संस्थानमध्ये कार्यक्रम
मंगळवारी सतपंथरत्न प.पू.महामंडलेश्वर आचार्य श्री जनार्दनहरीजी महाराज आणि प.पू.स.गु.शास्त्री स्वामी भक्तीकिशोरदासजी या संतद्वयींच्या शुभहस्ते पारीतोषिक वितरण करण्यात आले. हा सोहळा सतपंथ मंदिर संस्थान ,फैजपूर येथे पार पडला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात लॉकडाऊन असल्याने शाळा बंद होत्या. ऑनलाइन अभ्यास प्रक्रिया सुरू असल्याने इयत्ता पाचवी ते दहावी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन गणेश मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन कलाध्यापक नंदू पाटील यांनी केले होते. त्यात सामील झालेल्या विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीचा, शेतातील मातीचा व तत्सम माध्यमांचा वापर करून, गणपतीच्या मूर्ती तयार करण्यात आल्या.

यांनी पटकावला क्रमांक
या स्पर्धेत प्रथम पियुष राजेंद्र मेथाडकर तर द्वितीय क्रमांक यश शिवदत्त सानप व तृतीय क्रमांक साई भागवत चौधरी या विद्यार्थ्यांने पटकावला. या तिघांचा मंगळवारी दुपारी तीन वाजता महामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज आणि शास्त्री स्वामी भक्तीकिशोरदासजी यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना पारीतोषिक म्हणून अनुक्रमे पाचशे, तीनशे व दोनशे रुपये रोख व प्रत्येकी वचनांमृत हा पवित्र ग्रंथ भेट दिला. याप्रसंगी दोन्ही संतद्वयी यांचे शाल पुष्पहार अर्पण करून मुख्याध्यापक सी.सी.सपकाळे यांनी सन्मान केला तर उपस्थित सर्व पालकांचे सुद्धा या संतद्वयीनी आशीर्वादस्वरूप गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या स्वागताने पालक भारावले.

पालकांनी मुलांना प्रोत्साहित करावे
शास्त्री स्वामी भक्तीकिशोरदासजी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पालकांनी आपल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहित करून त्यांना लक्षपूर्वक पुढे सरकण्यास उद्युक्त करण्याचा सल्ला दिला तसेच मुख्याध्यापक सी.सी.सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नंदू पाटील यांनी केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !