माणुसकीला सलाम ! भुसावळात हिंदू व्यक्तीवर मुस्लीम बांधवांनी केले अंत्यसंस्कार


भुसावळ : ‘मजहब नहीं सिखाता आपसमें बैर रखना, हिंदी है हम, वतन है हिंदोस्ता हमारा’ 

या प्रसिद्ध उर्दू शायर अल्लामा इकबाल यांची ओळीला साजेसे कार्य भुसावळातील मुस्लीम बांधवांनी करून दाखवत समाजात माणुसकी अद्यापही शिल्लक असल्याचा प्रत्यय दिला. पापा नगरातील 60 वर्षीय हिंदू व्यक्तीचे गुरुवारी सकाळी निधन झाल्यानंतर कुणीही नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पुढे न आल्याने मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेत हिंदू पद्धत्तीने अंत्यसंस्कार केले. कोरोनाच्या कठीण काळात सहसा कुणी अंत्यसंस्कारासाठी जात नाही हे वास्तव असलेतरी मुस्लीम बांधवांनी माणुसकी जोपासत हिंदू पद्धत्तीने अंत्यसंस्कार केल्याने समाजा-समाजात तेढ निर्माण करण्यासाठी ही बाब निश्‍चितच चपराक ठरावी हेदेखील तितकेच खरे !

मुस्लीम बांधवांनी जोपासला आदर्श
भुसावळच्या पापा नगरात बाळू भाऊ निर्भर देशमुख (60) हे पत्नीसह गेल्या 40 वर्षांपासुन राहतात. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या बाळू भाऊ यांच्या पत्नी प्रतिभा देशमुख या धुणी-भांडी करून संसाराला हातभार लावतात तर गुरुवारी सकाळी 11.30 वाजता बाळू भाऊ यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला कुणीही नातेवाईक न आल्याने मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन तापी नदी काठावर हिंदू पध्दतीने अंत्यसंस्कार करीत समाजात आदर्श निर्माण केला. माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू, शेख अमीन शेख अमीर, शेख सलमान शेख पापा, प्रकाश धोबी, राजू पाटील, शेख ईमरान शेख पापा यांच्यासह या भागातील मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन तापी नदी काठावर हिंदू पद्धत्तीने बाळू भाऊ यांच्यावर अंत्यसंस्कार केले तर शेजारी शेख अमीन यांनी अग्नीडाग दिला.

भुसावळकरांनी जोपासली माणुसकी
क्षुल्लक कारणावरून दोन समाजात तेढ निर्माण होवून अनेक अप्रिय घटना जिल्ह्यासह अन्य तालुक्यांमध्ये नवीन नाहीत मात्र कॉस्मोपॉलिटीन शहरात सर्वच जाती-धर्माचे नागरीक गुण्या-गोविंदाने राहतात. त्यामुळे हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांनी केलेल्या हिंदू पद्धत्तीने अंत्यसंस्कार केल्यानंतर भुसावळकरांनी पुन्हा एकदा आपल्या माणुसकीचा प्रत्यय दिला यात शंकाच नाही. माजी नगरसेवक शेख पापा म्हणाले की, मयत बाळूभाऊ आमच्या भागात अनेक वर्षांपासून वास्तव्याला होते शिवाय कोरोनामुळे काही लोक अंत्यसंस्कारासाठीदेखील जात नसल्याचे दुर्दैव आहे मात्र जाती-धर्मापेक्षा माणुसकी आज श्रेष्ठ असल्याचे ते म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !