यावल तालुक्यात नुकसानीचा निधी वितरणात घोळ
तहसीलदारांसह कर्मचार्यांची चौकशी न झाल्यास आंदोलन : भाजपाचा इशारा
फैजपूर : 23 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडला होता. त्यावेळी तत्कालीन महाराष्ट्रातील भाजपा सरकारने शेतकर्यांच्या नुकसानीपोटी हेक्टरी आठ हजारांप्रमाणे अनुदान मंजूर केले व निधी उपलब्ध करून दिला. निधी उपलब्ध झालेला असताना शासकीय यंत्रणेमार्फत त्यांचे वितरण करणे गरजेचे असताना यावल तालुक्यांमध्ये निधी वितरण करताना बराच घोळ झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी भाजपा पदाधिकार्यांनी केली आहे.
निधी परत पाठवल्याने संताप
निधी वाटपात नाव एका यादीत तर खाते नंबर दुसर्याचा तसेच आजपर्यंत साधारण दोन हजार 100 शेतकर्यांना निधी मिळालेला नसून आपल्या कार्यालयाकडून माहिती घेतली असता निधी हा मुदतीच्या आत प्रशासनास परत पाठवण्यात आल्याने तालुक्यातील 21 शेतकर्यांना विनाकारण तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे व मनस्ताप होत आहे. निधी हा परत पाठवण्याची घाई का करण्यात आली तसेच अनुदान वाटपामध्ये निष्काळजीपणा झाल्याने हलगर्जीपणा केलेल्या कर्मचार्यांची तसेच तहसीलदार यांची चौकशी होऊन कारवाई करावी अन्यथा यावल तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे पंधरा दिवसांनी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी पंचायत समितीचे माजी सभापती भरत महाजन, भाजपा यावल शहराध्यक्ष डॉ.नीलेश गडे, फैजपूर शहराध्यक्ष अनंता नेहेते, सरचिटणीस संजय सराफ, तालुका उपाध्यक्ष किशोर पाटील, मच्छिंद्र चौधरी, माजी शहराध्यक्ष संजय रल, संजय भावसार, सुनील वर्मा आदी उपस्थित होते. या निवेदनावर भरत महाजन, उमेश हेगडे, निलेश गडे, अनंता नेते, संजय सराफ, किशोर पाटील आदींच्या स्वाक्षर्या आहेत.


