मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा
संभाजी ब्रिगेडची मागणी : प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांना दिले निवेदन
रावेर : महाराष्ट्रातील मराठा हाच कुणबी असून मराठा समाजाला न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने राज्य घटनेच्या 340 कलमानुसार ओबीसीसाठी पात्र ठरवले आहे. मराठा कुणबी असल्याचे 104 पुरावे आहेत. 1991 पासून आम्ही मराठा समाजाला ओबीसीत समावेश करावा, हीच मागणी करत आलो आहे. हेच आरक्षण टिकेल आणि ते महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत असून महाराष्ट्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, असे निवेदन प्रभारी तहसिलदार संजय तायडे यांना संभाजी ब्रिगेडतर्फे देण्यात आले.
हा तर मीठ चोळण्याचा प्रकार
शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणास स्थगिती मिळताच पोलिस भरती काढणे मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असून भरतीच रद्द करावी अथवा एसईबीसीच्या कोट्यातून 13 टक्के भराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष घन:श्याम पाटील, कार्याध्यक्ष योगेश महाजन, राजेंद्र चौधरी, डॉ.सुरेश पाटील, प्रकाश पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.


