भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये दहा व्हेंटिलेटर वापराविना पडून


माजी आमदार संतोष चौधरींची आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार : जिल्हा शल्य चिकित्सकांना लक्ष घालण्याचे आदेश

भुसावळ : भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये दहा व्हेंटिलेटर वापराविना पडून असल्याने त्यांचा वापर होण्यासंदर्भात आदेश द्यावेत, अशी मागणी भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेवून शुक्रवारी केली. यावेळी टोपे यांना या संदर्भात निवेदनही देण्यात आले. टोपे यांनी या प्रकाराबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना लक्ष घालण्याचे आदेश देण्यात आल्याचे चौधरी यांनी कळवले आहे.

उद्घाटनपासून व्हेंटिलेटर पडून
चौधरी यांनी केलेल्या तक्रारीचा आशय असा की, भुसावळात ग्रामीण रुग्णालयाजवळ नव्याने ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात आले असून या सेंटरला पुरवण्यात आलेले हा व्हेंटिलेटर 24 मे 2020 पासून वापराविना पडून आहेत. भुसावळ हे कोविडचे हॉटस्पॉट सेंटर ठरले असून दररोज रुग्णांची मोठ्या प्रमाणावर संख्या वाढत आहे. त्यातच भुसावळसह परीसरातील रुग्णांलयांमध्ये व्हेंटिलेटर मिळत नसल्याच्या तक्रारी आपल्याला प्राप्त होत असताना दुसरीकडे ट्रामा केअर सेंटरच्या बंद खोलीत व्हेंटिलेटर वापराविना पडून आहेत. या संदर्भात तातडीने चौकशी करून या व्हेंटिलेटरचा वापर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. टोपे यांनी या संदर्भात जळगाव जिल्हा शल्य चिकित्सकांना या संदर्भात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. निवेदनाची प्रत माहितीस्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जळगाव जिल्हाधिकार्‍यांनाही पाठवण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !