वरणगावात रस्ता काँक्रिटीकरण करण्याची मागणी
वरणगाव : रेल्वे स्थानकाच्या पलीकडं पाच हजार संख्येची सिद्धेश्वर नगर वस्ती वसलेली असून या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेच्या दोन पुलाखालून जावे लागते परंतु या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून नागरीकांना जीव मुठीत घेऊन रेल्वे रोड ओलांडावा लागत आहे यामुळे या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी महाराष्ट्र रक्षक ग्रुपच्या वतीने करण्यात आली.
लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज
गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धेश्वर नगरात जाण्यासाठी नागरीकांना रस्ता नाही. नागेश्वर महादेव मंदिरमार्गे गेले असता तीन ते चार किलोमीटरचा फेरा पडतो तर महात्मा गांधी विद्यालयापासून वेल्हाळेकडे जाणार्या रस्त्याने गेले तर रॉकेल डेपोपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून या ठिकाणी पायी चालणे कठीण झाले आहे. रस्त्यावरचे मोठे खड्डे पडल असून पुलाच्या खाली पाणी साचल्याने या ठिकाणी पायी चालणार्यांना रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते. यामुळे महात्मा गांधी विद्यालय ते सिद्धेश्वर नगर रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी महाराष्ट्र रक्षक ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष सविता माळी, तालुका सरचिटणीस शारदा माळी, तालुकाध्यक्ष रेखा देशमुख, लक्ष्मी बैरागी, कविता माळी यांनी निवेदनाद्वारे नगरपालिकेकडे केली आहे. नगरपालिकेच्या वतीने पुलाखाली थांबलेले पाणी काढण्यासाठी चारी खोदण्यात आली असलीतरी पाचशे मीटरचा रस्ता नादुरुस्त असून या ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने पायी अथवा मोटरसायकलने ये-जा करणे कठीण झाले आहे. सदरचा रस्ता हा बांधकाम विभागा तर्गत येत असल्याने नगरपालिकेला या ठिकाणी काम करता येत नाही. बांधकाम विभागाने रेल्वे पुलापर्यंत दोन्ही बाजूला काँक्रिटीकरण अथवा खड्ड्यांमध्ये मुरूम भरला तर येथील नागरीकांना ये-जा करण्यासाठी सुविधा होऊ शकते. आमदार संजय सावकारे यांनी याकडे लक्ष घालून या कामाला मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.


