मराठा समाज आरक्षणावरील स्थगिती उठवावी
रावेर तहसीलदारांना विश्व मराठा संघातर्फे निवेदन
रावेर : मराठा समाज आरक्षणावरील स्थगिती उठवावी व राज्याच्या घटनात्मक अधिकारांचा वापर करुन मराठा समाजाला सन 2020-21 या चालू वर्षांकरीता शिक्षण व शासकीय सेवांमध्ये लाभ देण्यात यावा, अशी मागणी विश्व मराठा संघातर्फे रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देवून करण्यात आली.
शासकीय नोकर भरतीत ठेवाव्यात जागा रीक्त
निवेदनाचा आशय असा की, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून स्थगिती उठवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, राज्याला असलेल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून मराठा समाजाला शिक्षण आणि शासकीय सेवांमध्ये लागू असलेले एसईबीसी आरक्षण अखंडित ठेवण्यासाठी त्वरीत अध्यादेश काढावा, मराठा आरक्षण स्थगितीबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत मराठा समाजाच्या वाट्याला येणार्या शासकीय नोकर भरतीमधील सर्व जागा रीक्त ठेवण्यात याव्यात किंवा सर्व प्रकारच्या नोकर भरती स्थगित कराव्यात, ओबीसी समाजाला इंद्रा सहानी निकालाचे निकष डावलून कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण न करता देण्यात आलेली मुदतवाढ देखील 2019 मध्ये संपलेली असून 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा प्रश्न यामुळे निकाली निघू शकतो याबाबत भूमिका स्पष्ट करावी, आरक्षण लागू होईपर्यंत मराठा बांधवांसाठी विशेष योजना लागू करावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना विश्व मराठा संघ रावेर तालुकाध्यक्ष अक्षय राजेंद्र सोनवणे, तालुका उपाध्यक्ष शुभम विकास चौधरी, तालुका कार्याध्यक्ष अमोल देविदास पाटील, तालुका संघटक चेतन डिगंबर पाटील, सहसंघटक चेतन प्रकाश पाटील, तालुका सचिव वेदांत अनिल पाटील, रेंभोटा शाखाप्रमुख प्रेम धानेश्वर पाटील, कल्पित जावरे,श्याम शिवरामे आदी उपस्थित होते.

