मुंबईच्या पोलिसाचे धुळ्यात रीव्हॉल्व्हरसह 30 जिवंत काडतुस लांबवले : दोघे आरोपी जाळ्यात


धुळे स्थानिक गुन्हे शाखेसह पश्‍चिम देवपूर पोलिसांची कारवाई

धुळे : मुंबई संरक्षा व संरक्षण शाखा क्रमांक दोनमध्ये कर्तव्यास असलेल्या पोलिस कर्मचार्‍याचे वडील गंभीर आजारी असल्याने ते पत्नी-मुला बाळांसह धुळ्यात रजेवर आले होते मात्र वडिलांना पाहण्यासाठी ते रुग्णालयात गेल्याने त्यांनी आपली पिस्टल असलेली बॅग बहिणीकडे ठेवल्याने चोरट्यांनी संधीचा फायदा घेत या बॅगेसह सोन्याचे मंगळसूत्र व रोकड लांबवली. 28 सप्टेंबर रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर पश्‍चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे स्थानिक गुन्हे शाखेसह पश्‍चिम देवपूर पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अवघ्या चार तासात या गुन्ह्याची उकल करीत दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. भरत सुरेश चौधरी (मनमाड जीन नाल्याजवळ, धुळे) व आमीन इकबाल अन्सारी (काझी प्लॉट, वडजाई रोड, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिस कर्मचार्‍याचेच पिस्टल लांबवले
कॉन्स्टेबल चेतनकुमार शामराव कोळी यांचे वडील गंभीर आजारी असल्याने कोळी यांनी पिस्टल व 30 जिवंत काडतूसे कार्यालयात जमा न करता धुळे येथे ते घाई-गर्दीत घेवून आले व पिस्टल असलेली बॅग किरण हौसींग सोसायटी, झेंडा चौकाजवळ राहत असलेल्या बहिणीच्या घरी ठेवली मात्र 28 रोजी त्यांनी बहिणीकडे येवून बॅग पाहिली असता तिची चोरी झाल्याचे उघड झाले. या बॅगेत पिस्टल, 30 जिवंत काडतुसांसह सोन्याचे मंगळसूत्र व रोकड मिळून एक लाख 76 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल होता. कोळी यांनी पश्‍चिम देवपूर पोलिसात धाव घेत या संदर्भात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून आरोपींना अटक
पोलिस कर्मचार्‍याची पिस्टल लांबवण्यात आल्याने अप्रिय घटनेचा धोका ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गांभीर्याने तपासाच्या सूचना केल्यानंतर आमीन अन्सारीला ताब्यात घेण्यात आले व त्याच्या ताब्यातून पिस्टल, 30 जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्यानंतर आरोपीने पिस्टल भरत चौधरीने ते दिल्याची कबुली दिल्याने दोघा आरोपींना अटक करण्यात आली.

यांनी केली आरोपींना अटक
जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पश्‍चिम देवपूर ठाण्याचे निरीक्षक सतीश गोराडे यांच्या नेतृत्वात मोईनोद्दीन सैय्यद, रफिक पठाण, गौतम सपकाळे, मुक्तार शेख, रमाकांत पवार, परशुराम पवार, अमोल रामराजे आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !