विधानसभा निवडणुकीची 13 सप्टेंबरला आचारसंहिता
जालन्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती
जालना : विधानसभा निवडणुकीची 13 सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे विविध महामंडळावर नियुक्त झालेल्या सदस्यांचा ओबीसी समाजातर्फे जाहीर सत्कार कार्यक्रमात दिली. ते म्हणाले की, राजकारणात आपण सरपंचापासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सगळी पदं भोगून झाली आहेत. आता कोणतीही अपेक्षा राहिली नाही. मात्र मुख्यमंत्री पदाबाबत पुढे बघू म्हणत त्यांनी सावध भूमिका घेतली.
15 ऑक्टोंबरपर्यंत निवडणुका
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यात गणपती उत्सवानंतर आचारसंहिता लागू होईल आणि 15 ऑक्टोबरच्या जवळपास विधानसभा निवडणूक होईल, असे विधान करीत निवडणुकीसाठी भाजप तयार असल्याचे सांगितले होते शिवाय युतीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि उद्धव ठाकरे घेणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान, मुनगंटीवार आणि दानवे यांच्या विधानानंतर 12 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीनंतर विधानसभेच्या तारखा जाहीर होऊ शकतात, अशी शक्यता आहे. गत वेळी 2014 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आणि आचारसंहिता 12 सप्टेंबर रोजी लागली होती तर 15 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली होती. यावेळीही मतदान आणि मतमोजणीची तारखा जवळपासच असण्याची शक्यता आहे.