आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबाला उभारी देण्यासाठी प्रशासन त्यांच्या दारी


रावेर : आदिवासी भागातील गारखेडा येथील आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबास उभारी देण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदार त्यांच्या पाड्यावर पोहोचले. प्रशासन आपल्या दारी आलेले पाहून आत्महत्या केलेले रेमसिंग बारेलांचे कुटुंब प्रचंड भावुक झाले. याप्रसंगी प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी मदतीचा धनादेश बारेला कुटुंबाला दिला.

उत्पन्न हाती न आल्याने केली होती आत्महत्या
ही घटना या वर्षीच्या फेब्रुवारीतील आहे. रेमसिंग बारेला आपल्या आई, पत्नी व तीन मुलांसह गारखेडाच्या पाड्यावर राहत होते तर त्यांच्याकडे असलेल्या शेतीच्या उत्पन्नावर आपल्यासह आपल्या परीवाराचे उदरनिर्वाह सुरू होता. रेमसिंग यांनी रब्बीच्या हंगामासाठी एक लाख रुपये कर्ज घेतले होते परंतु यंदा दुष्काळामुळे उत्पन्न काहीच न आल्याने रेमसिंग यांनी नैराश्यावस्थेत गळफास घेत आत्महत्या केली. या कुटुंबाला उभारी देण्यासाठी शुक्रवारी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे या अतिदुर्गम गारखेडा या पाड्यावर पोहोचल्या. या कुटुंबाला मदत आणि त्यांच्या मदतीसाठी योजनांची पडताळणी प्रांतधिकारी व तहसीलदारांनी केल्याने या कुटुंबालाही आर्श्‍चयाचा धक्का बसला. या कुटुंबाचे अठराविश्व दारीद्य्र पाहून स्वत: थोरबोले यांनी त्यांना आर्थिक मदत केली व त्यांच्या कुटुंबाना रेशनपासून ते पेंशनपर्यंत पडताळणी सुरू झाली. दरम्यान, अशाच पद्धत्तीने मयत शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना महसूल प्रशासन उभारी योजनेच्या माध्यमातून मदत करणार आहे. यावेळी त्यांच्या सोबत मंडळाधिकारी सचिन पाटील, तलाठी गुणवंत बारेला, ग्रामसेवक डी.एम.वळवी, कृषी सहाय्यक सिकंदर तडवी, सरपंच जुवाणसिंग बारेला, उपसरपंच इरफान तडवी, गाठू बारेला आदी ग्रामस्थ उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !