फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून 64 हजारांचा दंड वसुल
मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाची विशेष तिकिट तपासणी मोहिम
भुसावळ : कोरोना काळात रेल्वे प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्यांमधूनही काही प्रवासी विना तिकीट प्रवास करीत असल्याने अशा प्रवाशांविरुद्ध मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागातर्फे विशेष तिकिट तपासणी मोहिम राबवण्यात येत आहे. त्या 03 ऑक्टोबर रोजी भुसावळ ते नासिक दरम्यान ट्रेन क्रमांक 01056 , ट्रेन क्रमांक 02534 या गाडीत विशेष तिकीट अभियान विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय.डी.पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. त्यात 64 हजार 235 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
प्रवाशांमध्ये उडाली खळबळ
भुसावळचे वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी.अरुण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 3 ऑक्टोबर रोजी विशेष तिकीट तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली. या मोहिमेत एकूण 63 अनियमित प्रवाशांना दंड आकारण्यात आला आहे. 11 तिकीट तपासणी कर्मचारी आणि चार आरपीएफ कर्मचार्यांनी कारवाई करीत 64 हजार 235 रुपयांचा दंड वसुल केला. या मोहिमेत विना तिकीट प्रवास करणार्या 54 प्रवाशांकडून 50 हजार 180 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला तर तिकिटांच्या बदलीचे एका केसमध्ये तीन हजार 255 रुपयांचा दंड तसेच ज्येष्ठ नागरीक कोट्याचा गैरवापर केल्याने आठ प्रवाशांकडून 10 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वे प्रवाशांनी नियमांचे पालन करून रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


