विटव्याच्या शेतकर्याची तापीच्या बॅक वॉटरमध्ये आत्महत्या
रावेर : अती पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने तालुक्यातील सुभाष चौधरी या शेतकर्याने तापी नदीच्या बॅक वाटरमध्ये आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. चौधरी यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पंचायत समिती सभापती जितेंद्र पाटील यांनी केली आहे. विटवा येथील सुभाष विठ्ठल चौधरी (57) या शेतकर्याने त्यांच्या शेतात कपाशी व भाजी-पालाची लागवड केली तर यावर्षी सततच्या पावसाने या पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने आलेल्या नैराश्यातून शेतकर्याने गुरुवारी तापी नदीच्या बॅक वाटरमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत निंभोरा पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांनी शवविच्छेदन केले.

