अरण्य वाचनात घडले विविधांगी प्रजातींचे दर्शन
वन्यजीव संरक्षण सप्ताहानिमित्त कुर्हे पानाचे वनखंडात अभ्यासदौरा
भुसावळ : वन्यजीव संरक्षण सप्ताहानिमित्त भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे वनक्षेत्र विभाग, वन्यजीव संरक्षण संस्था आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे आयोजित अभ्यास दौर्यांतर्गत 453 हेक्टर कुर्हे पानाचे वनखंड 12 नंबरमध्ये पार पडलेल्या एकदिवशीय अरण्यवाचनात प्राणी, पशु, पक्षी, झाडी, झुडपे, वनस्पती यांच्या विविधांगी प्रजातींचे दर्शन घडले. कुर्हे पानाचे वनक्षेत्राचे वनपाल प्रल्हाद महाजन, कुर्हे पूर्वचे वनरक्षक संदीप चौधरी, कुर्हे पश्चिमचे वनरक्षक विलास काळे, भास्कर पाटील, नरेंद्र काळे, शिवदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास दौरा पार पडला.
यांचा दौर्यात समावेश
यात कुर्हे पूर्वचे वनरक्षक संदीप चौधरी, कुर्हे पश्चिमचे वनरक्षक विलास काळे, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र सतीश कांबळे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांच्यासह सुरेंद्र चौधरी, डी.के.पाटील, संजीव पाटील, डॉ.जगदीश पाटील, सुरेंद्रसिंग पाटील, संजय ताडेकर यांचा समावेश होता. पहाटेपासून कुर्हे पानाचे बारा गट नंबरमधील जामनेर रोड ते वाघूर धरणाच्या बॅक वॉटरपर्यंतच्या परिसराचे अरण्यवाचन करण्यात आले. यात जैवविविधता, गवताच्या प्रजाती, पाणवठे, वन्य प्राणी, त्याचे पाऊल ठसे, पशुपक्षी, त्यांचा अधिवास, तृण, वनस्पती यांचे निरीक्षण व आकलन करण्यात आले. यात सामान्यपणे आढळलेल्या वनस्पती विष्णुकांत, माका, टाकळा, आवळी, पत्थरशेपु, भुईगेंद, आग्या, एकदांडी, गोधडी, झारवड, सोनकी, अर्जुन सदडा, बेहडा, साल, कडुलिंब, बकाम, सलाई, साग, आराट, बोरती, बोर, पळस, व्यांखाई, बहावा, अमलताश यासह काटेरी झुडूपवर्गीय वनस्पती मोठ्या संख्येने आढळल्या. त्यात सोंनटिकली, मेकीं, चिलार, कुर्डु, लिकस सेफॉलोटस, कुसळ, बाभूळचा प्रकार मिमोसो हमाता, ग्लोरिसा सुपरबा, कळलावी आधी प्रकार आढळून आले. गवताच्या शाहद्या , पवण्या, गोंडळी, कुसली,कुंदा,रोयश्या, अशा प्रजाती आढळल्या. त्याचप्रमाणे अरण्यवाचनात चंडोल, करवानक, शिक्रा, मधुबाज, लाल मुनिया, इंडीयन सिल्व्हरबिल, खाटीक, खंड्या, रंगीत तितर, तुईया, सोनपाठी सुतार, पिवळ्या कंठाची रानचिमणी, रानखाटीक, बुलबुल, चिरक, दयाळ, जांभळा शिंजीर, निखार घार आदी पक्षी दृष्टिक्षेपास आले. तसेच नीलगाय, बार्किंग डिअर, फ्यान थ्रोटेड लिझर्ड आदी प्राण्यांचेही दूरवरून दर्शन झाले. बर्याच ठिकाणी सुगरण पक्ष्यांचा अधिवास आढळून आला. वन्यप्राणी अधिवासाच्या असंख्य खुणाही जाणवल्या तसेच ठिकठिकाणी प्राणी, पशुपक्षी यांच्या विष्ठा आढळल्या.

कोरोनामुळे गुळवेलवर संक्रांत
गेल्या सहा महिन्यांपासून थैमान घातलेल्या कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाय म्हणून गुळवेलचे महत्व पुढे आले त्यामुळे कुर्हे पानाचे वनखंडातून गुळवेल नेल्याने अतिशय कमी प्रमाणात गुळवेल निदर्शनास आली. गुळवेलचे कमी होत असलेले प्रमाण चिंताजनक ठरले.

