अजंगजवळ बेकायदा गॅस रीफिलिंगचा डाव उधळला : 32 लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळे तालुका पोलिसांची दमदार कामगिरी : तीन आरोपींना अटक, एक पसार
धुळे : जिल्ह्यातील अजंग गावाजवळील हॉटेल कलकत्ता पाठीमागे अवैधरीत्या गॅस रीफिलिंग होत असल्याची गोपनीय माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकत सुमारे 32 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या तर अंधाराचा फायदा घेत गॅस कंटेनर चालक असलेला आरोपी पसार झाला. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
32 लाखांचा मुद्देमाल जप्त
घटनास्थळावरून धुळे तालुका पोलिसांनी 25 लाख रुपये किंमतीचे गॅस टँकर (एम.एच.04 जे.के.2129) व त्यात 17 हजार 80 किलो वजनाचा व पाच लाख 28 हजार 692 रुपये किंमतीचा गॅस मिळून 30 लाख 28 हजार 692 रुपये किंमतीचा मुद्देमाल तसेच पाच हजार रुपये किंमतीचा रबरी पाईप, 47 हजार 500 रुपये किंमतीचे इंडियन गॅस कंपनीचे 19 सिलिंडर तसेच 14 हजार 500 रुपये किंमतीचे 14 खाली सिलिंडर तसेच 17 हजार रुपये किंमतीचे 10 कमर्शियल सिलिंडर व 900 रुपये किंमतीचा पोपट पाना मिळून 31 लाख 13 हजार 592 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

तिघा आरोपींना अटक : एक पसार
भरत हरीदास चौधरी (45, शिवाजी नगर, प्लॉट नंबर 95, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे), पारस जयंतीलाल जैन (28, योगेश्वर कॉलनी, दहिवेल, ता.पारोळा, जि.जळगाव), नरेंद्र देविदास हिवराळे (32, नवानगर बाळापूर, ता.बाळापूर, जि.अकोला) यांना अटक करण्यात आली तर अंधाराचा फायदा घेत गॅस कंटेनर चालक राहुल गजानन दाभाडे (टेंभूर्णा, ता.खामगाव, जि.बुलढाणा) हा पसार झाला.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपअधीक्षक प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, उपनिरीक्षक सागर काळे, हवालदार राजेंद्र मोरे, नाईक प्रवीण पाटील, किशोर खैरनार, चेतन चव्हाण, अन्वर पठाण, सांगळे, राकेश महाले, देसले, भ वसार तसेच तालुका पुरवठा अधिकारी छोटू चौधरी आदींच्या उपस्थितीत करण्यात आली. तपास उपनिरीक्षक सागर काळे करीत आहेत.

