भुसावळातील विरोधकांना पोटदुखीचा आजार : नगराध्यक्ष
भुसावळ : शहरातील प्रमुख मार्गांच्या डांबरीकरणाचा सोमवारी शुभारंभ होणार असल्याचे विरोधकांना माहित असल्याने त्यांनी जाणून बुजून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असल्याची टिका माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांचे नाव न घेता नगराध्यक्ष रमण भोळे यांनी केली. अमृत योजना व कोरोनामुळे शहरातील रस्त्यांच्या कामांना विलंब झाला मात्र आता कामे करण्यासाठी शासनाची परवानगी मिळाली असून सुरुवातीला प्रमुख रस्ते, मिरवणूक मार्ग व अन्य भागातील कामे होतील व सर्वच प्रभागात होतील, असेही ते म्हणाले. विरोधकांना थातूर-मातूर आंदोलन करून श्रेय घेण्याची सवय असल्याचे त्यांनी सांगत विरोधकांवर तोफ डागली. विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत दोन कोटी 98 लाख 58 हजार 812 रुपये खर्चाच्या कामांचा शुभारंभ जुना सातारा भागात सोमवारी झाला. याप्रसंगी नगराध्यक्ष बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, शफी पहेलवान, नगरसेवक मुकेश पाटील, गिरीश महाजन, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार आदी उपस्थित होते.

विकासकामे होणे गरजेेचे : खासदार
भुसावळातील निवडणुकीत विकासकामे करण्याच्या जोरावरच आम्ही मते मागितली असल्याने विकासकामे शहरात होणे गरजेचे आहे मात्र तांत्रिक अडचणीमुळे कामांना उशीर झाला. सर्वसामान्य नागरीकांना कामे या बाबीशी घेणे-देणे नसते केवळ विकासकामे व्हावे, अशी त्यांची इच्छा असते, असे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या. भुसावळ शहरातील अमर स्टोअर्स ते रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या कामांसंदर्भात आजच रेल्वे प्रशासनाला पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगत शहरात जी कामे होतील ती दर्जेदार व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

