भुसावळात घरफोडी : 37 हजारांचा ऐवज लंपास
भुसावळ : शहरातील लक्ष्मी नगरातील बंद घरातून चोरट्यांनी 37 हजारांच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. लक्ष्मी नगरात पालिकेचे गटनेते मुन्ना तेली यांच्या घराजवळ भाडेकरू म्हणून इकरामुल हक मोनिस खान राहतात. ते बाहेरगावी असल्याची संधी चोरट्यांनी साधत 16 मार्च ते 19 ऑक्टोबर चोरी केली व खान हे सोमवारी गावावरून घरी आल्यानंतर त्यांना घराचे कुलूप आढळले व चोरी उघड झाली. चोरट्यांनी घरातील एलईडी टिव्ही, चांदीच्या वाट्या, एक चांदीचा चमचा, सहा जोड चांदीचे पायल, तीन जोड लहान मुलांचे चांदीचे कडे, 13 हजार रुपये किंमतीची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, नाकातील फुली, कानातील सोन्याच्या रींग, लहान मुलीच्या कानातील सोन्याच्या रींग तसेच 12 हजार रुपये रोख आणि बारावीचे मार्कशीट, पदवीचे मार्कशीीट आणि अन्य महत्वाचे कागदपत्रे मिळून 37 हजारांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी इकरामुल हक मोनिस खान यांनी फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तेजस पारीसकर तपास करीत आहेत.

