भुसावळातील गुन्हेगारी हद्दपारीसाठी अॅक्शन प्लॅन
भुसावळचे नूतन पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची पत्रकार परीषदेत माहिती
भुसावळ : भुसावळातील गुन्हेगार हद्दपार करण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्यात येत असून सुरूवातील भुसावळ डिव्हीजनमधील सर्व गुन्हेगारांचा एकत्रीत डाटा तयार करण्यावर भर दिला जात आहे त्यामुळे गुन्हेगारांवर कारवाया करणे सोपे ठरणार असल्याचा आशावाद नूतन पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी व्यक्त केला. पदभारानंतर त्यांनी बुधवारी प्रथमच माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भुसावळातील गुन्हेगारी ऐकून असून यापुढे गुन्हेगारांना कायद्याचे भय राहील, अशी कारवाई पोलिस दलाकडून केली जाईल शिवाय शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासह रस्त्यावर बेशिस्तपणे लोटगाड्या लावणार्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे ते म्हणाले.
गुन्हेगारांचा डाटा एका क्लीकवर
वाघचौरे म्हणाले की, भुसावळ डिव्हीजनमधील गुन्हेगारांची यादी तयार केली जात असून प्रत्येकावर दाखल गुन्ह्यांची माहिती आता एका क्लीकवर मिळेल त्यामुळे कोणत्या गुन्हेगारावर कुठे-कुठे गुन्हे दाखल आहेत ते कळेल व शिवाय त्यानंतर पोलिसांकडून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई होईल व त्याच्या रोजच्या हालचालींची माहिती पोलिसांकडून गस्तीदरम्यान टीपण्यात येईल. प्रांताधिकारी व वकीलांशी चर्चा झाली असून लवकरच गुन्हेगारांवर हद्दपारीसह मोक्कांतर्गत कारवाई झाल्याचे दिसेल. शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासह रस्त्यावरील वाढलेले अतिक्रमण हटवण्यावर प्राधान्य असणार आहे.
स्मार्ट पोलिसींगला प्राधान्य
पोलिस उपअधीक्षक म्हणाले की, कर्मचारी मनुष्यबळाबाबत कमी आहे वा जास्ती यापेक्षा आहे त्या मनुष्यबळावर स्मार्ट पोलिसींग करण्यावर भर दिला जाईल. रात्रगस्तीत गुन्हेगारांची तसेच हिस्ट्रीशीटर यांची तपासणी केली जाईल शिवाय आतापर्यंतच्या गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांचा सहभाग आढळल्याने जुनाईल जस्टीस अॅक्टचा वापर प्रभावीपणे केला जाईल. गावठे कट्टे, चाकू व सुर्या बाळगणार्यांवर नियंत्रण आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नागरीकांच्या अपेक्षा पूर्ण करणार
गुन्ह्यांचा आलेख वाढला तरी पर्वा नाही मात्र पोलिस ठाण्यात तक्रार घेवून आलेल्या नागरीकांची तक्रार दाखल केली जाईल, असेही वाघचौरे म्हणाले. भुसावळ शहर व विभागात बेकायदा ढाब्यांमध्ये विकल्या जाणार्या दारू विक्रीला पायबंद लावण्यात येणार असून अवैध धंदे चालकांच्या याद्या मागवल्या असून जनतेला तसा रीझल्ट काही दिवसात दिसेल, असेही ते म्हणाले. यावेळी बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत उपस्थित होते.

