भुसावळात रेल्वेखाली आल्याने रेल्वेच्या यांत्रिक विभागातील ओएसचा मृत्यू
भुसावळ : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या रेल्वेच्या डीआरएम कार्यालयातील यांत्रीक विभागातील कार्यालय अधीक्षक यांचा कुठल्यातरी धावत्या गाडीखाली आल्याने मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे 6.45 वाजता स्वामी समर्थ केद्राजवळील रेल्वे लाईनीवर ही घटना घडली. चिंधू तुकाराम पाटील (53, खळवाडी, भुसावळ) यांचा मृत्यू झाला. गुरूवारी पहाटे पाटल हे मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडले होेते मात्र घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने तक्रार देण्यासाठी शहर पोलिस ठाणे गाठले व त्याचवेळी पोलिसांनी अनोळखी मृतदेहाबाबत अंगातील कपड्यांसह माहिती दिल्याने मुलाने घटनास्थळी धाव घेतली असता तो मुतदेह वडिलांचा निघाल्यानंतर मुलानेच हंबरडा फोडला. रेल्वेच्या डीआरएम कार्यालयातील यांत्रिक विभागात कार्यालय अधीक्षक (ओएस) म्हणून कार्यरत असलेले पाटील हे दररोज फिरायला जात
असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. अत्यंत शांत व सर्वांशी मिळून राहणारे पाटील यांच्या झालेल्या मृत्यू मुळे रेल्वे कर्मचार्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, हवालदार मोहंमद अली सय्यद, समाधान पाटील, जाकीर मन्सुरी यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परीवार आहे.

