50 हजार रुपये देणे पडेंगे, नही तो जानसे मार डालूंगा


भुसावळात डॉक्टरांना मागितली खंडणी : शेख कलीमसह अन्य तिघा अनोळखींविरुद्ध गुन्हा : जिल्हा पोलिस अधीक्षकांची घटनेच्या अनुषंगाने भुसावळात भेट

भुसावळ : शहरातील जामनेर रोवरील कोळंबे हॉस्पिटलचे डॉ.स्वनिल राजाराम कोळंबे यांना दर महिना 50 हजारांची खंडणी मागत रक्कम न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेख कलिमसह अन्य तिघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी बुधवारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात भेट देवून पोलिस अधिकारी व तक्रारदार डॉक्टरांकडून माहिती जाणून घेत कारवाईचे आश्‍वासन दिले. दरम्यान, शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत आमदार संजय सावकारे यांनीदेखील तक्रार पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली.

आठ दिवस डॉक्टरांना धमकावले
डॉ.कोळंबे यांच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपींनी 12 ऑक्टोबर रोजीच्या रात्री 7.55 ते 21 ऑक्टोबरच्या रात्री आठ वाजेदरम्यान वेळोवेळी जामनेर रोडवरील कोळंबे हॉस्पिटलमध्ये येवून तसेच रुग्णालयाच्या फोनवर तसेच मोबाईलवर फोन करून 50 हजारांची दरमहा खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच रुग्णालयाच्या काही कर्मचार्‍यांना चाकूचा धाक दाखवून धमकावले. ‘तुमको हॉस्पिटल चलाना है की नही’, कलीम शेख बात कर रहा हू. तुमको मुझे हर महिना 50 हजार रुपये देणे पडेंगे नही तो तुमको जानसे मार डालूंगा, असे संभाषण आरोपींनी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. शेख कलिमसह अन्य दोघा आरोपींविरुद्ध भादंवि कलम 387, 504, 506, 507, 34, 3/25, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.

गुन्हेगारांवर कारवाई होणार : पोलिस अधीक्षक
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी बुधवारी दुपारी बाजारपेठ पोलिस ठाण्याला भेट देत तक्रारदारांकडून माहिती जाणून घेतली. ते म्हणाले की, 12 ते 21 दरम्यान डॉक्टरांना धमकावण्यात आले, पोलिसांनी रुग्णालयाला भेट दिल्यानंतरही आरोपीने फोन करून पुन्हा धमकावले. दोषींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या असून शहरातील डॉक्टरांनी कुणी धमकावत असल्यास त्यांनी तक्रार द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. भुसावळातील गुन्हेगारी थोपवण्याबाबत निश्‍चित कारवाई होईल शिवाय शहर वाहतूक शाखेला बदली प्रक्रियेत अधिकारी आल्यानंतर अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, आमदार संजय सावकारे यांनीदेखील मुंढे यांची भेट घेत गुन्हेगारी रोखण्यासाठी पावले उचलण्याबाबत चर्चा केली. मागील काळात झालेले सर्व प्रकार अधीक्षकांच्या कानावर टाकल्याचे आमदार म्महणाले. आयएमए संघटनेनेदेखील गुंडांचा बंदोबस्ताबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. अध्यक्ष डॉ.नितीन पाटील व सचिव डॉ.विरेंद्र झांबरे यांची निवेदनावर स्वाक्षरी आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !